‘हायपरलूप’च्या चाचणी केंद्राची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी; कंपनीच्या अभियंत्यांचे पथक लवकरच पुण्यात

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई-पुणे मार्गावर हायपरलूप तंत्रज्ञानावर आधारित अतिवेगवान रेल्वे प्रकल्पाची उभारणी करण्याच्या दिशेने शनिवारी आणखी एक महत्त्वाचे पाऊल पडले. पुणे-मुंबई दरम्यानचा प्रवास अवघ्या २० मिनिटांवर आणणाऱ्या या तंत्रज्ञानाची लवकरच पुण्यात चाचणी होणार असून त्यासाठी संबंधीत कंपन्यांच्या अभियंत्यांचे पथक पुण्यात दाखल होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंपनीच्या अमेरिकेतील चाचणी केंद्राला भेट देऊन संबंधितांशी चर्चा केली. तसेच मुंबईत अत्याधुनिक डाटा सेंटर्स उभारण्यासह नागरिकांना अधिक गतीने सेवा देता याव्यात यासाठीही ओरॅकल ही कंपनी राज्य शासनासोबत काम करणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्याचे शिष्टमंडळ सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे.  मुख्यमंत्र्यांनी आज नेवाडा येथे व्हर्जिन हायपरलूप तंत्रज्ञानाच्या चाचणी केंद्रास भेट दिली. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक रॉब लॉइड यांनी मुख्यमंत्र्यांना यासंदर्भातील संपूर्ण माहिती दिली. मुंबई-पुणे या मार्गावर हायपरलूप तंत्रज्ञानावर आधारित अतिवेगवान रेल्वे प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. या प्रकल्पाची व्यावहारिकता पडताळण्यासाठी नुकताच एक अभ्यासही करण्यात आला आहे.  व्हर्जिन हायपरलूपचे संस्थापक आणि अध्यक्ष सर रिचर्ड ब्रॅनसन यांनी मुंबईत आयोजित मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कराराची घोषणाही केली होती.

शनिवारी झालेल्या चर्चेनुसार, व्हर्जिन हायपरलूप लवकरच आपल्या अभियंत्यांचे पथक पुण्याला पाठविणार आहे. या प्रकल्पासाठी पीएमआरडीएने पहिल्या टप्प्यात १५ किलोमीटरचा प्रायोगिक मार्ग (ट्रॅक) निश्चित केला आहे. मुंबई-पुणे अंतर केवळ २० मिनिटांवर आणणाऱ्या या तंत्रज्ञानासाठी आवश्यक असणारी ७० टक्के सामुग्री आणि उपकरण हे महाराष्ट्रातच उपलब्ध होऊ  शकणार आहेत. या १०० टक्के इलेक्ट्रिक व कार्यक्षम प्रणालीमुळे दीड लाख टन कार्बनचे उत्सर्जन प्रतिवर्षी कमी होणार असून वेळेची बचत, पर्यावरण रक्षण, अपघातांच्या संख्येत घट, वाहतूक कोंडीतून सुटका असे अनेक सामाजिक व आर्थिक फायदेसुद्धा होणार आहेत.

‘ओरॅकल’तर्फे मुंबईत अत्याधुनिक डाटा सेंटर्स

मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘ओरॅकल’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सॅफ्रा कात्झ यांचीदेखील सॅन फ्रॅन्सिस्को येथे भेट घेतली. मुंबईमध्ये अत्याधुनिक डाटा सेंटर्स सुरू करण्याची ‘ओरॅकल’ची तयारी आहे. त्यासाठी आवश्यक गुंतवणूक प्रस्तावांवरील कार्यवाहीस राज्य शासनाने गती द्यावी, अशी विनंती त्यांनी केल्यानंतर या संदर्भातील कार्यवाहीसाठी ‘ओरॅकल’ला आवश्यक ती सर्व मदत राज्य सरकारतर्फे दिली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी स्पष्ट केले. जनसामान्यांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा प्रदान करण्यासाठी आर्टिफिशियल इंटिलिजन्सचा वापर शासकीय माहितीच्या संदर्भात करता यावा, या हेतूने एक संयुक्त गट स्थापन करण्याबाबतसुद्धा या वेळी सहमती झाली. सोबतच आर्टिफिशियल इंटिलिजन्स, फिनटेक, क्लाऊड कॉम्प्युटिंग इत्यादींसंदर्भातही सविस्तर चर्चा झाली. नागरिकांना आपल्या कामांसाठी अनेक प्रकारची माहिती घेऊन विविध शासकीय विभागांकडे जावे लागते. यापासून त्यांना दिलासा देण्यासाठी एक विशिष्ट प्रणाली विकसित करण्यासंदर्भात राज्य सरकार ‘ओरॅकल’सोबत काम करणार आहे.

सायबर सुरक्षेसंदर्भात ‘सिमन्टेक’शी करार

मुख्यमंत्र्यांनी ‘सिमन्टेक’चे मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रेग क्लार्क यांचीही सॅन फ्रॅन्सिस्को येथे भेट घेतली. राज्य सरकारचा माहिती-तंत्रज्ञान विभाग आणि ‘सिमन्टेक’ यांच्यात सायबर सुरक्षेसंदर्भात एका सामंजस्य करारावर या वेळी स्वाक्षरी करण्यात आली. सायबर पोलिसिंग संदर्भात ‘सिमन्टेक’ आणि गृह विभाग यांच्यात संयुक्त कृती दल स्थापन करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. या माध्यमातून यापूर्वीच स्थापन करण्यात आलेल्या सायबर लॅबची क्षमता वृद्धी आणि विकास साध्य होणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai pune journey can be done in just 20 minutes
First published on: 17-06-2018 at 01:55 IST