मुंबईत काल संध्याकाळपासून सुरु झालेली पावसाची संततधार अद्यापही कायम आहे. शहर आणि उपनगरात अधून-मधून पावसाच्या मुसळधार सरी कोसळत आहेत. चेंबूर, कुर्ला, वांद्रे, खार, विलेपार्ले, घाटकोपर, मुलुंड, भांडूप, दहीसर, बोरीवली, सायन, ठाणे, डोंबिवली या भागात जोरदार पाऊस झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एसव्ही रोड, खार सबवे या सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मात्र वाहतुकीला अद्याप ब्रेक लागलेला नाही. हिंदमात परिसरात दरवर्षी पाणी साचते. यावेळी पालिकेने तिथे पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप बसवले आहेत. त्यामुळे तिथे पाणी साचलेले नाही. मुंबईच्या तिन्ही मार्गावर लोकल सेवा सुरळीत सुरु आहे फक्त मध्य रेल्वेच्या मार्गावर लोकल काही मिनिट उशिराने धावत आहे.

पहाटे पाचवाजेपर्यंत सांताक्रूझमध्ये ९६.६ मिमि पावसाची नोंद झाली आहे. मागच्या सोमवारीही मुंबईत जोरदार पाऊस कोसळल्यामुळे रस्ते, रेल्वे वाहूतक विस्कळीत झाली होती. मुंबईत आणखी काही तास हा पाऊस असाच सुरु राहिला तर नक्कीच मुंबईच्या गतीला ब्रेक लागेल.

हवामान विभागाने या आठवड्यात संपूर्ण देशभरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असून काही ठिकाणी तर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. जम्मू काश्मीर, तामिळनाडू, आसाम, उत्तराखंड, पूर्व उत्तर प्रदेश व गुजरातमध्ये काही अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

शुक्रवार हा देखील कोकण, गोवा व कर्नाटकच्या किनारी भागासाठी जोरदार पावसाचा असेल असा अंदाज आहे. यावर्षी केरळच्या किनारपट्टीवर पाऊस तीन दिवस आधीच म्हणजे 29 मे रोजी धडकला. त्यानंतर त्याचं महाराष्ट्रातही आगमन झालं. मात्र, कोकण किनारपट्टीवर काही दिवस वगळता पावसानं दडी मारली होती. आता मात्र महाराष्ट्रासह देशातल्या बहुतेक राज्यांमध्ये या आठवड्यात मुसळधार पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी अतिवृष्टीचा धोका आहे. अतिवृष्टीच्या इशाऱ्यामध्ये महाराष्ट्रातील कुठल्याही भागाचा समावेश नाहीये.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai rain water logging
First published on: 03-07-2018 at 07:12 IST