ब्रिटनमध्ये करोना व्हायरसचा नवा प्रकार सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा लॉकडाउन करण्यात आला आहे. दरम्यान व्हायरसचा शिरकाव मुंबईत होऊ नये यासाठी महापालिका आयुक्तांनी महत्त्वाची पावलं उचलली आहे. व्हायरसच्या नव्या प्रकाराला रोखण्यासाठी आम्ही सज्ज आहोत असंही त्यांनी म्हटलं आहे.  मुंबईत नव्या करोना व्हायरसचा शिरकाव होऊ नये म्हणून सर्वतोपरी काळजी घेतली जाईल हेच आमचे लक्ष्य आहे असे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील महापालिका क्षेत्रांमध्ये रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत संचारबंदी लागू केली आहे. त्यानंतर आता मुंबई महापालिका आयुक्तांनीही महत्त्वाची पावलं उचलली आहेत.

आणखी वाचा- समजून घ्या : काय आहे करोनाचा नवा प्रकार?

काय म्हटलं आहे आयुक्तांनी?
“करोनाच्या नव्या विषाणूचा प्रादुर्भाव मुंबईत होऊ नये आणि तो इथे पसरू नये यासाठी आम्ही कसोशीचे प्रयत्न करतो आहोत. उद्या रात्री १२ नंतर ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांना बंदी घालण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात जी विमानं लंडनहून मुंबईत येणार आहेत त्यातून साधारण १ हजार प्रवासी उद्यापर्यंत मुंबईत येतील. या सगळ्या प्रवाशांना क्वारंटाइन केलं जाणार आहे. मुंबईतील विविध हॉटेल्समध्ये आम्ही २ हजार रुम्सची व्यवस्था केली आहे. ब्रिटनमधून मुंबईत येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची तपासणी केली जाणार आहे. जो प्रवासी करोना पॉझिटिव्ह असेल त्याला तिथून सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. एवढंच नाही तर युरोप आणि इतर आखाती देशांमधून येणाऱ्या प्रवाशांसाठीही सात दिवसांचे सक्तीचे क्वारंटाइन असणार आहे” असंही आयुक्त चहल यांनी सांगितलं आहे.

आणखी वाचा- करोनाचा नवा प्रकार जास्त घातक? लस प्रभावी ठरणार का?

काय म्हटलं आहे आयुक्तांच्या आदेशात?

ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांना सात दिवसांसाठी संस्थात्मक क्वारंटाइन केलं जाणार, त्याचा खर्च प्रवाशांचाच असेल

करोनाची लक्षणं ज्या प्रवाशांमध्ये आढळतील त्यांना थेट सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं जाणार

आरटीपीसीआर टेस्ट विमानतळावरही होणार आणि हॉटेलमध्ये क्वारंटाइन झाल्यानंतरही पाचव्या किंवा सातव्या दिवशी केली जाणार, त्यानंतर प्रवाशाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास त्याला घरी सोडलं जाणार आणि घरी सात दिवस क्वारंटाइन केलं जाणार

ब्रिटनहून थेट किंवा त्यामार्गे येणाऱ्या प्रवाशांसाठी हॉटेलपर्यंत पोहचण्यासाठी बेस्ट सेवा उपलब्ध असणार

सध्याच्या घडीला विविध हॉटेल्समध्ये २ हजार रुम्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे

इमिग्रेशन ऑफिसर्सना पीपीइ किट दिले जाणार.