मुंबईसह राज्यभरात सरकारी रुग्णालयांमधील डॉक्टरांना होणाऱ्या मारहाणीविरोधात मुंबईतील निवासी डॉक्टरांचे बेमुदत बंद आंदोलन सुरु केले आहे. डॉक्टरांच्या आंदोलनामुळे नायर, शीव आणि केईएम रुग्णालयात रुग्णांचे हाल होत आहेत.
धुळे येथील निवासी डॉक्टरवरील हल्ल्याचे प्रकरण ताजे असतानाच नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी, प्रशिक्षणार्थी डॉक्टर व कर्मचारी यांना शुक्रवारी मारहाण करण्यात आली. तर लगेचच दुसऱ्या दिवशी शनिवारी सायंकाळी लोकमान्य टिळक पालिका रुग्णालयातील (शीव) निवासी डॉक्टरावरही अशाच प्रकारे हल्ला करण्यात आला.
रेखा सिंह (६०) यांना शनिवारी दुपारी १२च्या सुमारास शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापूर्वीही रेखा शीव रुग्णालयात उपचार घेत होत्या. १५ दिवसांपूर्वी त्यांच्या कुटुंबियांनी डॉक्टरांची परवानगी नसतानाही रेखा यांना रुग्णालयातून हलविले. मात्र प्रकृती गंभीर झाल्यानंतर शनिवारी सकाळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त असलेल्या रेखा यांची प्रकृती सायंकाळी अधिक खालावली. रात्री साधारण दहाच्या सुमारास त्यांना मृत घोषित करण्यात आले. यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांनी निवासी डॉक्टर डॉ. रोहित कुमारला मारहाण केली होती. या मारहाणीप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. औरंगाबादमध्येही डॉक्टरांना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे.
शीव रुग्णालयातील घटनेनंतर डॉक्टरही आक्रमक झाले आहेत. रुग्णालयात घडणाऱ्या या सततच्या हल्ल्यामुळे निवासी डॉक्टरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्ल्यांच्या निषेधार्थ मुंबईतील निवासी डॉक्टरांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. डॉक्टरांच्या कामबंद आंदोलनामुळे रुग्णांचेही हाल होत आहेत. शीव रुग्णालयाबाहेर रुग्णांच्या नातेवाईकांची गर्दी झाली आहे. सध्या रुग्णालयांमध्ये फक्त अत्यावश्यक सेवाच सुरु आहे.
Mumbai: Crowd outside Sion Hospital as resident doctors across Maharashtra are on strike after recent incidents of violence against doctors pic.twitter.com/1yo9GrkCvA
— ANI (@ANI) March 20, 2017
Mumbai: Doctors sitting on silent protest outside OPD at Sion Hospital after recent incidents of violence against doctors pic.twitter.com/QXZiQL57vx
— ANI (@ANI) March 20, 2017