रागाच्या भरात माणूस काय करेल सांगता येत नाही. रागातूनच अनेकदा जीवघेण्या घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना मुंबईतील लोकल रेल्वेत घडली. लग्न करण्यास नकार दिल्याच्या रागातून एका तरुणाने २१ वर्षीय तरुणीला धावत्या लोकलसमोर ढकलून दिलं. यात तरुणी गंभीर जखमी झाली असून, तब्बल १२ टाके लागले आहेत. खार रेल्वेस्थानकावर ही घटना घडली असून, हा शहारा आणणारा प्रसंग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जखमी झालेली तरुणी आणि तिला धक्का देणारा तरुण दोन वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. ते दोघेही एकाच ठिकाणी काम करायचे. दोघांमध्ये चांगले मित्रत्वाचे संबंध निर्माण झाले. मात्र, त्यानंतर आरोपी तरुणाला दारूचं व्यसन असल्याचं तरुणीला कळालं. ही गोष्ट कळाल्यानंतर तरुणी त्यांच्यापासून अंतर ठेवून राहू लागली. मात्र, तो तरुणीला त्रास देऊ लागला. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध तक्रारही केली होती. मात्र, तरीही त्याचं त्रास देणं सुरूच होतं.

मुंबईतील खार रेल्वे स्थानकावर शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. सुमेध जाधव असं आरोपी तरुणाचं नाव असून, तो वडाळा येथील रहिवासी आहे. तर तरुणी खार येथील रहिवासी आहे. शुक्रवारी सायंकाळी सुमेध तिचा पाठलाग करत होता. पाठलाग करतच अंधेरी रेल्वे स्थानकावरून तो लोकलमध्ये चढला. त्यानंतर तरुणीने तिच्या आईला फोन करत मदत मागितली. रेल्वे स्टेशनवर तरुणी आईला भेटली. त्यानंतरही आरोपी तिचा पाठलाग करतच होता. तिथेच त्याने लग्नाचा प्रस्ताव दिला. मात्र, तरुणीने तो फेटाळून लावला.

लग्नाला नकार दिल्यानंतर सुमेधनं स्वतःला संपवण्याची धमकी दिली. रेल्व स्थानकात येणाऱ्या गाडीच्या दिशेनं तो धावत सुटला, पण अचानक थांबला आणि पुन्हा परत आला. त्यानंतर तरुणीला जबरदस्तीने पकडलं आणि लोकलच्या दिशेनं घेऊन गेला. रेल्वे स्थानकातून सुटल्यानंतर त्याने तरूणीला प्लॅटफॉर्म आणि धावत्या रेल्वेच्या मध्ये ढकललं. तरुणीच्या आईने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत तरुणीच्या डोक्याला जबर मार बसला. जखमी झालेल्या तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिला १२ टाके पडले आहेत. पोलिसांनी आरोपीला स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक केली आहे. त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai shocker woman refuses to marry man he pushes her in front of moving train bmh
First published on: 21-02-2021 at 08:26 IST