चेंबूरच्या कमला लॉजमध्ये सापडलेल्या केरळमधील तरुण व्यापाऱ्याच्या मृतदेहाबद्दल तपास करता करता एकामागोमाग एक उलगडत गेलेला विचित्र घटनाक्रम पोलिसांना थक्क करून गेला. मुंबईसह केरळ आणि तामिळनाडूत तपास केल्यानंतर या तरुणाने स्वत: आत्महत्या करून आपल्या हत्येचा देखावा उभा करण्यास भाग पाडले. डोक्यावर चढलेला कर्जाचा डोंगर, कर्ज देणाऱ्यांनी मागे लावलेला ससेमिरा चुकवण्यासाठी या तरुणाने आत्महत्येचा निर्णय घेतला होता. पण आत्महत्या केल्यास विम्याचा परतावा कुटुंबाला मिळणार नाही हे लक्षात येताच त्याने हत्येचा देखावा उभा करण्याचा निर्णय घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एस. सतीश असे या तरुण व्यापाऱ्याचे नाव असून तयार सोन्याचे दागिने विकणे हा त्याचा व्यवसाय होता. १४ जानेवारीला कमला लॉजवर त्याचा मृतदेह आढळला. मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होता. मात्र मृतदेहाच्या मनगटांवर कापल्याच्या खुणा होत्या आणि घरात रक्ताचा थारोळा आढळला. पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. कुटुंबीय आणि मित्र परिवाराकडून माहिती घेऊन चेंबूर पोलिसांनी केरळ गाठले. व्यापाऱ्यांकडून सतीश सोने विकत घेई आणि त्याचे तयार दागिने मुंबईसह प्रमुख शहरांमध्ये विकत. व्यापाऱ्यांचे सुमारे साडेसोळा किलो सोन्याचे कर्ज सतीशच्या डोक्यावर होते. त्यातच त्याने परिसरात तीन घरे कर्जावर घेतली होती. व्यापाऱ्यांचा तगादा चुकवण्यासाठी सतीश आत्महत्येच्या विचारात होता. पण आत्महत्या केल्यास विम्याचा परतावा कुटुंबाला मिळणार नाही हे लक्षात येताच त्याने मार्टिन, कुमार ऊर्फ शर्वनन आणि मोहम्मर रियाज कमालुद्दीन यांना आत्महत्येनंतर आपल्या हत्येचा देखावा उभा करण्याची कल्पना सुचवली. मार्टिनने त्यास नकार दिला. पण शर्वननने रियाझला तयार केले. त्यानुसार १४ जानेवारीला सतीशने हाताच्या नसा कापून घेतल्या आणि पंख्याला गळफास घेतला. रियाझने सतीशचे हात बांधल्यासारखे केले आणि लॉजच्या खोलीला बाहेरून कुलूप लावून पसार झाला. पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा सतीशसोबत एक व्यक्ती खोलीत आली, काही मिनिटांत निघून गेली असे चित्र सीसीटीव्हीतून समोर आले. पोलिसांनी या प्रकरणी सतीशच्या तिन्ही मित्रांना अटक केली आहे.

इतरही गुन्ह्य़ांमध्ये सहभाग

कर्ज फेडण्यासाठी सतीशने शर्वनन व रियाझ यांना हाताशी धरून काही गुन्हेही केल्याचे समोर आले आहे. सतीशने केरळच्या त्रिसूर शहरातील एका व्यापाऱ्याच्या अपहरणाचा कट रचला होता. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूने पोलीस बंदोबस्त असल्याने हा कट फसला. त्यानंतर तिघांनी याच शहरातील एक दागिने बनविण्याचा कारखाना फोडण्याचा तीनदा प्रयत्न केला. मात्र हे प्रयत्नही फसले.

 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai suicide news
First published on: 09-02-2017 at 00:20 IST