काळी-पिवळी टॅक्सीचालकांची भूमिका
कमी भाडय़ात आरामदायी वातानुकूलित सेवा पुरवणाऱ्या अ‍ॅपआधारीत टॅक्सींचा पारंपरिक काळ्या-पिवळ्या टॅक्सीचालकांनी इतका धसका घेतला आहे की कुठल्याही नवख्या संघटनेच्या झेंडय़ाखाली ते आता एकत्र येऊन सामान्य प्रवाशांना वेठीस धरू लागले आहे. अशाच एका संघटनेने २१ जूनला पुकारलेल्या संपाला मध्य व दक्षिण मुंबईतील काही टॅक्सीचालकांनी पाठिंबा दर्शविला होता. आताही ही संघटना २६जुलैला संप पुकारण्याची भाषा करताच काही टॅक्सीचालक या झेंडय़ाखाली पुन्हा एकत्र आले. परंतु, संप पुढे ढकलण्याची घोषणा संघटनेने केल्याने प्रवाशांची मंगळवारी होणारी परवड तूर्तास वाचली आहे.
मुंबईत वर्षांनुवर्षे टॅक्सीमेन्स युनियन, मुंबई ऑटोमन्स युनियन या संघटनांचे रिक्षा-टॅक्सीचालकांमध्ये वर्चस्व राहिले आहे. या संघटनांच्या जोडीला नितेश राणे यांनी स्वाभिमान टॅक्सी संघटनेद्वारे टॅक्सीचालकांचे प्रश्न मांडण्यास सुरूवात केली. तिचाही आता बऱ्यापैकी बोलबाला झाला आहे. परंतु, गेल्या महिन्यात २१ जूनला आंदोलन पुकारणाऱ्या ‘जय भगवान महासंघ’ या संपूर्ण अनोळख्या संघटनेमुळे मुंबईच्या काही भागात प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या नेतृत्त्वाखाली आझाद मैदान येथे हे आंदोलने करण्यात आले होते. यावेळी कोणतीही पूर्वइतिहास नसताना केवळ ओला, उबेरचा मुद्दा पुढे करत महासंघाने शहरातील टॅक्सी चालकांना एकत्र करण्याचे काम केले. आता २६ जुलैला होणाऱ्या संपाला स्थागिती देण्यात आली असली तरी यापुढे आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय महासंघाने घेतला आहे. त्यामुळे कोणीही यावे आणि मुंबईकरांना वेठीस धरावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
याबाबत जय भगवान संघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांना विचारले असता, ही संघटना औरंगाबादची असून केवळ एक सामाजिक संघटना आहे. कोण्याही राजकीय पक्षाशी किंवा रिक्षा-टॅक्सी संघटनेशी आमचा संबंध नाही. यात कोणीही सदस्य नसून औरंगाबादला या संघाची नोंदणी दोन वर्षांपूर्वी करण्यात आली आहे.
मराठवाडय़ातील अनेक तरुण काळीपिवळी टॅक्सीवर चालक म्हणून काम करतात. त्यांच्यावर अन्याय होत असल्याने आम्ही आंदोलन करत आहोत असे सानप यांनी स्पष्ट केले. मात्र महासंघाकडून टॅक्सीवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या फलकांवर बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे यांचे एकत्रित छायाचित्र झळकत असल्याने या संघाला राजकीय पाठबळ दिले जात असल्याचा आरोप केला जात आहे. शिवाय संपूर्ण फलक ‘भगव्या’ रंगात तयार करण्यात आल्याने अनेक संघटनाचे कार्यकर्ते महासंघाला भाजप-शिवसेना पक्षाचा पाठिंबा असल्याचा आरोप करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai taxi drivers affright with ola uber cabs
First published on: 26-07-2016 at 03:06 IST