अभियंता इस्थर अनुहय़ा हत्या प्रकरणाचा छडा लावत मुंबई गुन्हे शाखेने तिच्या मारेकऱ्यासह आणखी एकाला अटक केली आहे. चंद्रभान सानप (२८) असे या आरोपीचे नाव आहे. तो वाहनचालक म्हणून काम करतो. रेल्वे स्थानकातून इस्थरला घरी सोडण्याच्या बहाण्याने त्याने तिला आपल्या मोटारसायकलवर बसवले होते. मात्र निर्जनस्थळी नेऊन त्याने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. इस्थरने प्रतिकार करताच त्याने तिची गळा आवळून हत्या केली.
मूळ हैदराबादची रहिवासी असलेली २३ वर्षीय इस्थर अंधेरीला ‘टीसीएस’मध्ये संगणक अभियंता होती. ५ जानेवारीपासून ती बेपत्ता होती. १६ जानेवारी रोजी तिचा कुजलेला आणि अर्धवट जळालेला मृतदेह पूर्व द्रुतगती महामार्गावर कांजूरजवळ झुडुपात सापडला होता.
या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना सीसी टीव्हीच्या चित्रणात लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये इस्थरसोबत एका संशयित दिसला होता. त्याचा शोध घेऊन पोलिसांनी कांजूर येथून चंद्रभान सानप (२८) याला ताब्यात घेतले. चंद्रभान मूळ कांजूर येथे राहणारा असून सध्या नाशिक येथे एका कंपनीत वाहनचालक आहे. तो मद्यपि असून त्याची गुन्हेगारी पाश्र्वभूमी आहे. ४ जानेवारीला रात्री त्याने भरपूर मद्यपान केले होते. ५ ला पहाटे लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकात तो प्रवाशांचे सामान चोरण्याच्या उद्देशाने आला होता. तिथे त्याला इस्थर एकटी दिसली. तिला त्याने ३०० रुपयांत अंधेरीला टॅक्सीतून सोडू, असे सांगितले. पण नंतर जेव्हा ती बाहेर आली तेव्हा सानपकडे टॅक्सी नसून मोटारसायकल आहे हे समजले.
इस्थरने सुरुवातीला त्याला नकार दिला. पण माझा मोबाइल आणि मोटारसायकलचा क्रमांक घरच्यांना दे, असे सांगून त्याने तिचा विश्वास संपादन केला. अखेर इस्थर मोटारसायकलवर बसली. त्याने मोटरसायकल पूर्व द्रुतगती महामार्गावरून कांजूरच्या निर्जनस्थळी नेली.
इस्थरने केलेल्या प्रतिकारामुळे बलात्काराचा त्याचा प्रयत्न असफल झाला. परंतु झटापटीत त्याने तिचे डोके जमिनीवर आपटले आणि तिच्या गळ्यातील स्कार्फने तिचा गळा आवळला. यानंतर तो पुन्हा घटनास्थळी गेला आणि पेट्रोल टाकून तिचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. झटापटीत लांब पडलेला तिचा मोबाइल त्याला सापडला नाही. पण तिची ट्रॉली बॅग आणि लॅपटॉप घेऊन तो पळून गेला.