थंडीचा पुढला टप्पा ३ जानेवारीपासून
लहरी हवामानाचे आणखी एक रूप मुंबईकरांना पाहायला मिळत असून डिसेंबरच्या अखेरच्या आठवडय़ात उन्हाचे चटके बसण्याची वेळ आली आहे. मंगळवारी कमाल तापमान चक्क ३६.३ अंश से.वर पोहोचले होते. गेल्या दहा वर्षांत डिसेंबरमध्ये तीन वेळा तापमान ३६ अंश से.वर पोहोचले असले तरी ते महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात थंडी सुरू होण्यापूर्वी नोंदले गेले होते. मात्र तापमान ११ अंशांपर्यंत खाली गेल्यानंतर पुन्हा एकदा उकाडय़ाचे चक्र सुरू झाले आहे. थंडीचा पुढचा टप्पा ३ जानेवारीपासून सुरू होईल, असा वेधशाळेचा अंदाज आहे.
हिवाळ्यात वाऱ्यांची दिशा पूर्वेकडून उत्तरेकडे बदलत जाते. उत्तरेचे वारे हे पूर्वेपेक्षा थंड असतात. उत्तरेकडून वारे वाहण्यास सुरुवात झाली की दिवसा व रात्रीचेही तापमान कमी होते. डिसेंबरच्या तिसऱ्या आठवडय़ात या प्रकारे उत्तरेचे वाहण्यास सुरुवात झाली व तीन दिवस मुंबईत कुडकुडणारी थंडी पडली. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा वाऱ्यांचे चक्र उलटय़ा दिशेने फिरण्यास सुरुवात झाली आणि पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव वाढला. सकाळी लवकर उत्तरेकडून वारे वाहण्यास सुरुवात झाली की, थंड वाऱ्यांच्या प्रभावाने तापमान फारसे वाढत नाही. सध्या वाऱ्यांचा वेग पडलेला असून ताशी दोन किलोमीटर वेगाने संथ वारे वाहत आहेत. त्यातच उत्तरेचे वारे सकाळी उशिरा वाहण्यास सुरुवात होत आहे. मंगळवारी कुलाब्याला सकाळी दहा वाजता तर सांताक्रूझला सकाळी ११ वाजता वारे वायव्येकडून येण्यास सुरुवात झाली. तोपर्यंत सूर्यप्रकाशाने हवेचे तापमान वाढले होते.