सर्वाधिक वेगवान ‘टेल्गो’ भारतीय रेल्वेसेवेत दाखल

मुंबई ते दिल्ली हा प्रवास आता फक्त १२ तासांत पूर्ण करणारी ‘टेल्गो’ ही भारतातील सर्वाधिक वेगवान रेल्वे लवकरच भारतीय रेल्वेसेवेत रुजू होणार आहे.

या गाडीची चाचणी सोमवारी सायंकाळी ७ वाजून ५५ मिनिटांनी घेण्यात येणार आहे. ही गाडी दिल्लीहून सुटेल. पलवल-मथुरा, कोटा-सुरतमार्गे मंगळवारी सकाळी दहा वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. ताशी १५० किमी तर सरासरी १२५ किमी वेग असलेली ही टेल्गो मुंबई ते दिल्ली हे १३४८ किमीचे अंतर फक्त १२ तासात पूर्ण करेल. राजधानी एक्स्प्रेसला हेच अंतर कापण्यासाठी सुमारे १६ तास लागतात. म्हणूनच भारतातील वेगवान रेल्वेचा मान टेल्गोने मिळवला आहे.

टेल्गोमध्ये विविध प्रकारचे सेंसर लावण्यात आले असून या मार्गावरील सर्व विभागांना या वेगवान गाडीच्या चाचणीचा लेखाजोखा करावा असे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी आर.डी.एस.ओ.च्या अभियंत्यांचे पथक ठेवण्यात येणार आहे. तसेच स्पेनमधूनही अभियंत्यांचा गट यासाठी उपस्थित राहणार आहेत. मे महिन्यात अशा प्रकारची चाचणी उत्तर प्रदेशमधील बरेली ते मोरादाबाद आणि पलवल ते मथुरा या मार्गावर करण्यात आली. त्यामुळे चाचणी यशस्वी झाल्यानंतर मुंबई ते दिल्ली हा रेल्वेप्रवास अधिक जलद होण्यास मदत होईल.