मुंबईतील भांडूप परिसरात रविवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी १३ वाहनांची जाळपोळ केल्याची घटना समोर आली आहे. या आगीत ११ दुचाकी आणि २ चार चाकी वाहनांचे नुकसान झाले असून याप्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरु केला आहे. पुण्यापाठोपाठ आता मुंबईतही गाड्यांची जाळपोळ झाल्याने अशा समाजकंटकांना रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भांडूपमधील श्रीराम पाडा परिसरात मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी १३ वाहनांना लक्ष्य केले. अज्ञात व्यक्तींनी लावलेल्या आगीत ११ दुचाकी तर २ चारगाडी गाड्या जळाल्या. वैयक्तिक वादातून ही जाळपोळ करण्यात आली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून वाहनचालकांनी आता पोलिसांकडे धाव घेतली आहे. आरोपीचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. आगीचे लोण दिसताच स्थानिकांनी आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी प्रयत्न केले. पण आगीचे स्वरुप भीषण असल्याने त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

पुण्यामध्ये वाहन जाळण्याच्या घटना वारंवार होत असतात. आता मुंबईतही वाहन जाळल्याचा प्रकार समोर आल्याने भांडूपमधील नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai unidentified miscreants torch 13 vehicles in bhandup
First published on: 27-03-2017 at 09:50 IST