मुंबई : परीक्षेचे अर्ज, प्रश्नपत्रिका पाठवणे, उत्तरपत्रिका तपासणे ऑनलाइन केल्यानंतर आता मुंबई विद्यापीठाने पुढील टप्पा गाठला असून आता विद्यार्थ्यांना गुणपत्रिकाही ऑनलाइन मिळणार आहेत. अभियांत्रिकी शाखेच्या प्रथम वर्षांच्या श्रेयांक मूल्यमापन (सीबीसीएस) प्रणालीच्या एका तुकडीला ऑनलाइन गुणपत्रिका देण्यात येणार आहेत.

शासनाच्या अगरवाल समितीने विद्यापीठांच्या परीक्षांचे काम पूर्णपणे ऑनलाइन करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार विद्यापीठाने प्रवेश अर्ज ते निकालापर्यंतचे सर्व काम ऑनलाइन करण्यास सुरुवात केली. मूल्यांकन ऑनलाइन करणे, परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका ऑनलाइन पाठवणे यानंतर आता निकाल, गुणपत्रिका, तपासलेल्या उत्तरपत्रिका ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हिवाळी सत्रातील प्रथम वर्ष अभियांत्रिकी शाखेच्या परीक्षेच्या सत्र १ सीबीसीएस ‘सी’ स्कीमचा निकाल विद्यापीठाने जाहीर केला. या निकालाच्या गुणपत्रिका विद्यार्थ्यांना ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अभियांत्रिकी शाखेने या शैक्षणिक वर्षांपासून प्रथम वर्षांसाठी सुधारित अभ्यासक्रम लागू केला आहे. या ऑनलाइन गुणपत्रिकेवर विषयाचा कोड, नाव व गुण, प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षेचे गुण, सीजीपीए व ग्रेड या सर्व बाबी दर्शविण्यात आलेल्या आहेत.