पोलिसांच्या गाडय़ा.. प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षकांची मोठी फौज.. येणाऱ्याजाणाऱ्यांवर करडी नजर.. प्राध्यापकांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या हालचालींवर लक्ष, हे सर्व वर्णन आहे मुंबई विद्यापीठाच्या कालिना संकुलातील. डॉ. नीरज हातेकर यांच्या निलंबनानंतर विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे विद्यापीठाला एखाद्या पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. कालिना संकुलात इतकी वर्षे खुल्या असलेल्या प्रवेशावर आता अचानकपणे बंधने टाकण्यात आली आहेत. विद्यापीठात काम करणाऱ्या प्राध्यापकांनाही रोज प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षकांच्या चौकशीला सामोरे जाऊन मगच प्रवेश दिला जात आहे.
डॉ. हातेकर यांच्या निलंबनाच्या प्रश्नावर विद्यार्थी, प्रसारमाध्यमे तसेच विविध स्तरांवरून विरोध होत असताना विद्यापीठाने सावध पवित्रा घेत संकुलातील सुरक्षा अधिक कडक केली आहे. मागील आठवडय़ापासून विद्यापीठ परिसरात एक मोठी पोलिसांची गाडी सातत्याने उभी असते. इतकेच नव्हे, तर शनिवारी विद्यार्थ्यांनी भरविलेल्या जाहीर सभेदरम्यान एक प्रवेशद्वारही बंद करण्यात आले होते.
यापूर्वी विद्यापीठाच्या सुरक्षेवरून अनेकदा प्रश्न उपस्थित झाले होते तेव्हा मात्र विद्यापीठाने सुरक्षाव्यवस्थेत कोणताही बदल केलेला नव्हता. कालिना संकुलात सर्वाना प्रवेश खुला होता. एकाही विद्यार्थ्यांला, प्राध्यापकांना किंवा पत्रकारांना प्रवेशद्वारावर अडविले जात नव्हते. आता ही पद्धत सुरू करण्यात आली असून गेली अनेक वष्रे विद्यापीठात अध्यापनाचे काम करणाऱ्या सुरक्षारक्षकांशी परिचित असलेल्या प्राध्यापकांची गाडी प्रवेशद्वारावर अडविली जाऊन माहिती विचारली जाते, असे एका प्राध्यापकाने सांगितले. एका व्यक्तीच्या हेकेखोरपणामुळे संपूर्ण विद्यापीठ वेठीस धरले जात असल्याचेही या प्राध्यापकाने नमूद केले आहे. डॉ. हातेकर यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ विद्यार्थी सनदशीर मार्गाने आंदोलन करत आहेत म्हणूनच की काय राज्यकर्ते किंवा विद्यापीठ प्रशासनाचे त्यांच्याकडे लक्ष वेधले जात नाही. हेच जर त्यांनी तोडफोड केली असती तर लक्ष गेले असते का, असा उपहासात्मक प्रश्नही प्राध्यापकांकडून विचारला जात आहे.