विद्याविहार स्थानकाजवळ असलेल्या नटराज बारमधील तीन कर्मचाऱ्यांची हत्या करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी त्यांचे मृतदेह हॉटेलच्या आवारात आढळून आले. मृतांमध्ये वेटर, सफाई कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक यांचा समावेश आहे.
विद्याविहार स्थानकाजवळील नटराज बारमध्ये सफाई करण्यासाठी आलेल्या सफाई कर्मचाऱ्याला सकाळी ८ च्या सुमारास गच्चीवर या तिघांचे मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत दिसले. त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. त्यात सुरक्षा रक्षक भास्कर दळवी (५०), वेटर राजन डकोल्या (३५) आणि सफाई कामगार वसंत मडीवल (३०) यांचा समावेश आहे. वेटर राजन आणि सफाई कामगार यांचे मृतदेह कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या छोटय़ा खोलीत आढळले तर सुरक्षा रक्षक दळवी यांचा मृतदेह गेटच्या आत आढळला.
पूर्व विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त कैसर खलीद यांनी सांगितले की, या बार आणि रेस्टॉरंटचे दार बाहेरून बंद होते. पूर्ववैमनस्य किंवा चोरी हा उद्देश या हत्येमागे असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.
दररोज रात्री दीडपर्यंत हा बार सुरू असतो. त्यांनतर साफसफाई करून आणि काम आवरून सर्व कर्मचारी पहाटे चारच्या सुमारास बाहेर पडतात. या हॉटेलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. परंतु रात्री सव्वादोनच्या नंतर येथील सीसीटीव्ही कॅमेरे बंद झाल्याचे आढळून आले आहे. हल्लेखोर हा माहितीगार असल्याचा अंदाजही पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला.
टिळक नगर पोलिसांनी या तिहेरी हत्याकांडाचा छडा लावण्यासाठी दहा पथके स्थापन केली आहेत. हॉटेलमधील सर्व कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी काही नमुने ताब्यात घेतले असून ते न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवले आहेत. या तिघा कर्मचाऱ्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. या बारपासून अवघ्या काही अंतरावरच पोलीस चौकी आहे. पोलिसांनी आणलेले श्वान पथकही विद्याविहार स्थानकाजवळ जाऊन थांबले होते.