नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये जोरदार घमासान सुरू आहे. आधी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे मेहुणे डॉ. सुधीर तांबे आणि सत्यजीत तांबे यांच्यावर बंडखोरीचा आरोप झाला. मात्र, निवडणूक निकालानंतर सत्यजीत तांबेंनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र काँग्रेसवर गंभीर आरोप करत प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना लक्ष्य केलं. या काळात बाळासाहेब थोरात रुग्णालयात होते. आज (५ फेब्रुवारी) थोरात संगमनेरमध्ये परतत आहेत. या पार्श्वभूमीवर नाना पटोलेंना पत्रकारांनी थोरातांना फोन करणार का? असा प्रश्न विचारला. यावर पटोलेंनी प्रतिक्रिया दिली.
नाना पटोले म्हणाले, “बाळासाहेब थोरात सक्रीय होत आहेत हे चांगलं आहे. आमचं त्यांच्याबरोबर बोलणं सुरू आहे. एवढ्यात माझं त्यांच्याशी बोलणं झालं नाही. त्यांनी लवकर बरे होऊन काँग्रेस पक्षाच्या कामाला लागावं, अशा आमच्या त्यांना सदिच्छा आहेत.”
कसब्यातून काँग्रेसचा उमेदवार कोण असणार?
कसब्यातून काँग्रेसचा उमेदवार कोण असणार? या प्रश्नावर नाना पटोले म्हणाले, “आज रात्रीपर्यंत कसबा मतदारसंघातून आमचा उमेदवार कोण असणार हे सांगू. माध्यमांनी काँग्रेसमध्ये काय सुरू आहे त्याबरोबर भाजपात काय सुरू आहे हेही दाखवावं.”
“आज रात्रीपर्यंत आमचा उमेदवार निश्चित होईल”
“आज रात्रीपर्यंत आमचा उमेदवार निश्चित होईल आणि आम्ही उद्या आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करत आहोत. उद्या साडेनऊ वाजता कसबा पेठेच्या गणपतीसमोर आम्ही एकत्र येऊ. त्या ठिकाणी आरती करून निघू,” असंही पटोलेंनी नमूद केलं.
दरम्यान, नाना पटोले म्हणाले होते, “कसबा आणि चिंचवडची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी विनंती भाजपाच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोनवरून चर्चा झाली. त्यांना आपण एकत्रित बसून यावर सविस्तर चर्चा करूया, असं सांगितलं. मात्र माझा फोन होताच पुढील अर्ध्या तासात टिळक कुटुंबाऐवजी दुसर्या उमेदवाराला भाजपाकडून संधी देण्यात आली.”
“भाजपाने कशाप्रकारे टिळक कुटुंबाला न्याय दिला”
“यातून भाजपाची नीती दिसून येते. मुक्ता टिळक यांनी आजारी असताना देखील विधिमंडळात येऊन मतदानाचा हक्क बजावला होता. यातून भाजपाने कशाप्रकारे टिळक कुटुंबाला न्याय दिला,” असं म्हणत त्यांनी भाजपावर टीका केली.