‘आंतराराष्ट्रीय जाहिरात संघटने’चा ‘वर्क टू लिव्ह टू वर्क’ उपक्रम

घडय़ाळ्याच्या काटय़ावर चालणारी मुंबईकरांची धावपळ, वाढती गर्दी आणि परिणामी होणारे अपघात हे दुष्टचक्र संपुष्टात येण्यासाठी ‘वर्क टू लिव्ह टू वर्क’ असे अनोखे अभियान ‘आंतराराष्ट्रीय जाहिरात संघटने’च्या(आयआयए) भारतातील संस्थेने हाती घेतले आहे. एल्फिन्स्टन येथील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर कामावर वेळेत पोहचण्याची घाई कर्मचाऱ्यांच्या जिवावर बेतू नये यासाठी कंपन्यांनी कामाच्या वेळा कर्मचाऱ्यांच्या सोईनुसार बदलत्या ठेवाव्यात, अशी मांडणी या अभियानाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. ‘आयआयए’च्या व्यवस्थापन समितीच्या सदस्य आणि ‘लोड स्टार यूए इंडिया’ कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नंदिनी डायस यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

कामावर वेळेत पोहचण्यासाठी कर्मचारी वर्गाकडून केला जाणारा जिवाचा आटापिटा थांबावा, म्हणून ‘आयआयए’ या संस्थेने ‘वर्क टू लिव्ह टू वर्क’ अभियान सुरू केले.

या अभिनयाच्या माध्यमातून मुंबई विभागातील कंपन्याना कर्मचाऱ्यांच्या सोईनुसार कामाच्या वेळा बदलण्याची मुभा द्यावी, जेणेकरून कामावर वेळेत पोहचण्यासाठी त्यांची होत असलेली घाई जिवावर बेतणार नाही, अशी मांडणी विविध कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मानव संसाधन विभागाचे प्रमुखांकडे नंदिनी डायस करत आहेत.

मुंबईतील दळवळणांच्या सुविधांचा दर्जा सुधारण्यासाठी मोठा कालावधी लागणे अपेक्षित आहे. तेव्हा या सुविधांची वाट न पाहता कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा सोईनुसार बदलत्या ठेवल्या तर वाहतूक व्यवस्थेवरील गर्दीचा ताण हलका होईल. समाजाच्या हितासाठी संवाद हे प्रभावी माध्यम असू शकते, या संकल्पनेतून आयआयएम ही संस्था दरवर्षी एक उपक्रम हाती घेते. यावेळेस मुंबईकरांच्या जीवनाशी जोडलेला हा उपक्रम संस्थेने निवडला आहे, असे ‘आयआयए’चे अध्यक्ष रमेश नारायण यांनी सांगितले.