दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईत रविवारी एक नवा राजकीय सामना सुरू होणार आहे. नरे पार्कवरील  मनसेचा मेळावा आणि शिवाजी पार्कवरील शिवसेनेचा दसरा मेळावा हे या सामन्याचे प्रतिस्पर्धी असतील, व मनसेप्रमुख राज ठाकरे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात आमनेसामने होईल, अशी चिन्हे आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक हेच या सामन्याचे निमित्त असून, शिवसेनेतील पक्षांतर्गत घडामोडींचे संदर्भही यामागे असल्याने तमाम मुंबईचे लक्ष या सामन्याकडे लागून राहिले आहे. नरे पार्कवर बाळासाहेबांच्या नावाने समाजपयोगी उपक्रमांचे उद्घाटन करताना राज ठाकरे या कामाला शिवसेनेने केलेल्या विरोधाचा समाचार घेतील आणि सायंकाळी शिवसेनेच्या मेळाव्यात उद्धव त्याची जोरदार परतफेड करतील, अशी अटकळ आहे.