scorecardresearch

संशोधक आणि उद्योजक हा देशविकासाचा कणा

नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

संशोधक आणि उद्योजक हा देशविकासाचा कणा
आयआयटी मुंबईचा ५६ वा पदवीप्रदान सोहळा शनिवारी झाला. त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थिती होती.

नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

संशोधक आणि उद्योजक हे देशविकासाचा कणा आहेत. जे देश संशोधनाबाबत निष्क्रिय राहतात त्यांची प्रगतीच खुंटते, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ‘आयआयटी’मुंबईच्या ५६व्या पदवीदान सोहळ्यात केले. देशातील ‘आयआयटी’ म्हणजे परिवर्तनाचे माध्यम आहे, असे उद्गारही त्यांनी काढले.

नित्यनूतन संशोधन आणि नवनवे उपक्रम यांची देशाला गरज आहे. ही गरज प्रशासनातून नव्हे, तर तुमच्यासारख्या धडाडीच्या नवसंशोधकांतूनच पूर्ण होणार आहे. पुढील दोन दशके ही संशोधन आणि तंत्रज्ञानाचीच असतील, असेही मोदी म्हणाले.

ऊर्जा आणि पर्यावरण यात समतोल राखण्याचे मोठे आव्हानही येत्या दोन दशकांत देशासमोरच नव्हे, तर जगासमोर उभे ठाकणार आहे. त्या आव्हानातून मार्ग काढण्यासाठी आयआयटीचा वारसा लाभलेल्या संशोधकांचीच मोलाची मदत आवश्यक ठरणार आहे, असेही ते म्हणाले.

मुंबई आयआयटीला सरकारने एक हजार कोटी रुपयांचे साह्य़ केले आहे. तसेच आयआयटी, आयआयएम, आयआयएससीसारख्या नव्या संशोधन संस्थांसाठी सुमारे एक लाख कोटी रुपये उभारण्याचे काम आम्ही करत आहोत. जग आज आयआयटीला स्टार्टअप नर्सरी म्हणून ओळखते. ज्याची सुरुवात आपल्या भारतातून झाली आहे. त्याचसोबत हा स्टार्टअप उद्योग सुमारे एक हजार अब्ज डॉलरच्या पलीकडे जाणार असल्याचे भाकितही मोदी यांनी वर्तविले.

यावेळी राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, सिम्फनी टेक्नॉलॉजी ग्रुपचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रोमेश वाधवानी उपस्थित होते. वाधवानी यांना यावेळी डॉक्टरेट पदवीने गौरविण्यात आले. यावेळी २६२१ पदवी, ३८० डॉक्टरेट पदवी आणि एक मानद डॉक्टरेट पदवी देण्यात आली.

मोदी वक्तव्ये..

  • आयआयएमप्रमाणेच आयआयटीनेही आपल्या प्रशासकीय मंडळावर एक माजी विद्यार्थी घ्यावा, जेणेकरून त्याचा फायदा संस्थानाला होईल, अशी सूचना मोदी यांनी केली. त्याचप्रमाणे परिसरातील शाळांसाठी आयआयटीचा परिसर खुला करावा. त्यामुळे विज्ञानाचा प्रसार होईल, असेही मोदी म्हणाले.
  • इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीला (आयआयटी) त्यांनी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रान्सफॉरमेशन असे संबोधले. देशातील या ‘आयआयटीं’नी जगात ‘ब्रॅण्ड इंडिया’ प्रस्थापित केला आहे, असेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-08-2018 at 00:55 IST