मुंबई : बदललेल्या राजकीय परिस्थितीत समाज माध्यमांचा प्रभावी वापर करून भाजपचा मुकाबला करण्याचा काँग्रेसने निर्धार केला आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून नागपूर येथे २८ व २९ मे असे दोन दिवस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या समाजमाध्यम विभागाचे राज्यस्तरीय व राष्ट्रीयस्तरावर शिबाराचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवारी २८ मे रोजी आयोजित राज्यस्तरीय शिबिरात काँग्रेसच्या समाज माध्यम विभागाच्या राज्य कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी व जिल्हा स्तरावरील पदाधिकारी सहभागी होतील. या वेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले व राज्यातील पक्षाचे इतर मंत्री उपस्थित राहणार आहेत.

रविवारी २९ मे रोजी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय शिबिरात देशभरातील विविध राज्यांतील काँग्रेस पक्षाचे समाजमाध्यम विभागाचे समन्वयक व प्रमुख पदाधिकारी सहभागी होतील. या वेळी अखिल भारतीय काँग्रेस समितीचे संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल, अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या समाज माध्यम विभागाचे प्रमुख रोहन गुप्ता व इतर नेते उपस्थित राहणार आहेत.

उदयपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या  संकल्प शिबिरात राष्ट्रीय व प्रदेश स्तरावर समाज माध्यम विभाग अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेण्यात आला. तरुण वर्ग डोळय़ासमोर ठेवून भाजपकडून समाज माध्यमाचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. त्याचा मुकाबला करण्यासाठी समाज माध्यमांचाही प्रभावी व परिणामकारक वापर करण्याचे काँग्रेसने ठरविले आहे.

ईडीचे तंबूच ठोका : अतुल लोंढे

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्या घरावर सीबीआयने पुन्हा एकदा छापा टाकला. काँग्रेस नेत्यांच्या घरांवर सातत्याने छापे टाकले जात आहेत. असे वारंवार छापे टाकण्यापेक्षा मोदी सरकारने काँग्रेस नेत्यांच्या घराबाहेरच कायमस्वरूपी सीबीआय, ईडीच्या पथकाचे तंबूच तैनात करावेत, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.