मुंबई : राज्य मंडळाच्या दहावीचा आतापर्यंतचा सर्वाधिक ९६.९४ टक्के निकाल शुक्रवारी जाहीर झाला. ही परीक्षा देणाऱ्या राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय सर्वेक्षणातील गणित, विज्ञान, भाषा, सामाजिकशास्त्र या विषयांतील कामगिरी ५० टक्केही नाही. विद्यार्थी तेच, अभ्यासक्रमाचा मूलभूत आराखडाही तोच असे असताना दोन्ही परीक्षांमधील निकालातील तफावतीमुळे राज्यातील विद्यार्थ्यांची नेमकी कोणती गुणवत्ता पातळी खरी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 राज्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक दैन्यावस्था गेल्या महिना अखेरीस जाहीर झालेल्या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (नॅशनल अचिव्हमेंट सव्‍‌र्हे) अहवालातून समोर आली. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने निश्चित केलेल्या अध्ययन निष्पत्ती निकषांनुसार विद्यार्थ्यांची शैक्षणिक पातळी जोखण्यासाठी गेल्यावर्षी (२०२१) ऑक्टोबरमध्ये देशभरात एकाचवेळी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण करण्यात आले. दहावीतील विद्यार्थ्यांची गणित, विज्ञान, भाषा, सामाजिकशास्त्र, इंग्रजी या विषयांची चाचणी घेण्यात आली. मार्च-एप्रिलमध्ये झालेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (राज्यमंडळ) दहावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनीच सर्वेक्षणासाठीची चाचणीही दिली होती. या चाचणीसाठीचा अभ्यासक्रमही तोच होता. या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार दहावीच्या विद्यार्थ्यांचे सरासरी गुण (संपादणूक) हे ५० पेक्षाही कमी होते. इंग्रजी वगळता बाकी चारही विषयांत ३० टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना विज्ञान, सामाजिक शास्त्रातील प्राथमिक संकल्पनाही स्पष्ट झालेल्या नसल्याचे दिसून आले. मात्र राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी ९६.९४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

राष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये राज्यातील विद्यार्थ्यांचे गणितातील सरासरी गुण २९ होते, तर ३३ टक्के विद्यार्थ्यांना प्राथमिक संकल्पनाही स्पष्ट झाल्या नव्हत्या. राज्य मंडळाच्या परीक्षेत गणितातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण ९७.८२ टक्के आहे. विज्ञानाची राष्ट्रीय सर्वेक्षणातील सरासरी ३४ होती, ७७ टक्के विद्यार्थ्यांना प्राथमिक संकल्पना स्पष्ट झाल्या नसल्याचे समोर आले होते. राज्य मंडळाच्या परीक्षेत विज्ञान विषयांचा निकाल ९८.०८ टक्के लागला आहे.

प्रथम भाषा, द्वितीय भाषेची राष्ट्रीय सर्वेक्षणातील सरासरी ४४ होती, तर ४६ टक्के विद्यार्थ्यांना प्राथमिक संकल्पनाही कळल्या नव्हत्या. राज्य मंडळाच्या परीक्षेत भाषा विषयांचा निकाल ९५ ते ९८ टक्के लागला आहे. सामाजिक शास्त्र विषयांच्या निकालातही विरोधाभास दिसत आहे. राष्ट्रीय सर्वेक्षणातील सरासरी ३८ होती तर ५८ टक्के विद्यार्थ्यांना प्राथमिक संकल्पना कळल्या नसल्याचे उघड झाले. या विषयांचा राज्य मंडळाच्या परीक्षेचा निकाल ९८.३३ टक्के लागला आहे. इंग्रजीची राष्ट्रीय सर्वेक्षणातील सरासरी ४६ होती, तर १९ टक्के विद्यार्थ्यांना प्राथमिक संकल्पना स्पष्ट झाल्या नव्हत्या. राज्य मंडळाच्या परीक्षेचा इंग्रजीचा निकाल ९८.८४ टक्के आहे.

विरोधाभास असा..

सर्वेक्षणानुसार दहावीच्या विद्यार्थ्यांचे सरासरी संपादणूक गुण ५० पेक्षाही कमी होते. इंग्रजी वगळता बाकी चारही विषयांत ३० टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना विज्ञान, सामाजिक शास्त्रातील प्राथमिक संकल्पनाही स्पष्ट झालेल्या नव्हत्या. मात्र ९६.९४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.