राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्यावर झाला. २८ खासदार असणाऱ्या गुजरातमधील असणारी व्यक्ती पंतप्रधान बनू शकते तर ४८ खासदार असलेल्या महाराष्ट्रातील महाराजांचा मावळा हा सर्वोच्च स्थानी का विराजमान होणार नाही असं वक्तव्य अमोल कोल्हे यांनी केलं होतं. तेव्हा पंतप्रधान होण्याचं स्वप्न पहाणं वाईट नाही, पण त्यांचा पक्ष १० खासदारांचा आकडाही पार करु शकला नाही अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

तेव्हा फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “पवार साहेब पंतप्रधान होतील असा कुठलाही दावा केलेला नाही. उलट पवार साहेब देशातल्या सर्व राजकीय पक्षांना एकत्र आणण्याचे काम करत आहेत आणि विरोधकांच्या एकजुटीमुळे मोदी सरकार हे सत्तेतून बाहेर जाईल हे आमचे म्हणणे आहे. देवेंद्रजी तुम्ही शाळेत होतात तेव्हा ८४ साली लोकसभा निवडणुकीत भाजपची संख्या दोनवर गेली होती आणि तुमचे खासदार सायकलवर बसून डबलसीट संसदेत जात होते, हे तुम्ही विसरला का ?”, असे नवाब मलिक म्हणाले. ” मला वाटतं ही लोकशाही आहे. अमृत पिऊन कोणी सत्तेत बसत नाही, हे देवेंद्रजी यांना कळले पाहिजे. देवेंद्रजी जेव्हा पवार साहेबांवर टीका करतात तेव्हा चमत्कार घडतात. आम्ही २०२४ ला चमत्कार घडवू”, असं मलिक यांनी म्हंटलं आहे.

दरम्यान वादग्रस्त शब्दाबाबत खासदार संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्तेचा दुरुपयोग भाजपच्या वतीने होत आहे हे काही नवल नाही, जे कोणी भाजपाच्या विरोधात भुमिका घेतात त्यांच्या विरोधात सत्तेचा दुरपयोग करुन कारवाई केली जाते. कायदेशीर कारवाईला राऊत साहेब तोंड देतील आणि त्यातही भाजपाला उघडं पाडतील अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली आहे.