मुंबई : आर्यन खान प्रकरणात लाचखोरीच्या आरोपाबाबत दक्षता पथकाने अमलीपदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांची बुधवारी चार तास चौकशी केली. यावेळी काही महत्त्वपूर्ण कागदपत्रेही पथकाने ताब्यात घेतली.

वानखेडे यांच्या चौकशीसाठी ‘एनसीबी’चे दक्षता पथक दिल्लीहून मुंबईत आले आहे. पथकाने वानखेडे यांची चौकशी केली. त्यापूर्वी ‘एनसीबी’च्या मुंबई कार्यालयातून काही कागदपत्रे व चित्रफिती या पथकाने ताब्यात घेतल्या. या प्रकरणी एनसीबी शाहरुख खानची व्यवस्थापक पूजा दादलानी यांच्यासह के. पी गोसावी, प्रभाकर साईल यांचाही जबाब नोंदविणार असल्याचे समजते.

मुंबईतील ‘एनसीबी’च्या कार्यालयातून काही कागदपत्रे गोळा करण्यात आली आहेत. साक्षीदारांना बोलावण्यात आले आहे. या प्रकरणी चौकशी पूर्ण झाल्यानंतरच माहिती देण्यात येईल, अशी प्रतिक्रिया ‘एनसीबी’चे अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी दिली. दरम्यान, याप्रकरणात जबाब नोंदवण्यासाठी के. पी. गोसावी व प्रभाकर साईल यांच्याशी ‘एनसीबी’च्या दक्षता पथकाने जबाब नोंदवण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा संपर्क होऊ शकला नसल्याचे समजते.

आणखी एका पंचाचा आरोप

प्रभाकर साईलनंतर आता ‘एनसीबी’विरोधात आणखी एक पंच शेखर कांबळे यांनी गंभीर आरोप केले आहेत. खारघर येथे एनसीबीने केलेल्या एका कारवाईनंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील नायजेरियन व्यक्तीला अटक करण्यात आली होती. शेखर कांबळे यांना या प्रकरणात पंच करण्यात आले होते. या प्रकरणी १० कोऱ्या कागदावर आपल्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्याचा आरोप शेखर यांनी केला आहे. तसेच आपल्याला तो पंचनामा वाचण्यास दिला नाही. त्याशिवाय त्या कारवाईवरच कांबळे यांनी पश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कारवाईत काहीच सापडले नव्हते, पण ६० ग्रॅम एमडी सापडल्याचे दाखवण्यात आल्याचे सांगून कांबळे यांनी खळबळ उडवून दिली. या प्रकरणामुळे मी आणि माझा एक मित्र आम्ही प्रचंड दहशतीत आहोत. काल समाजमाध्यमांवर सर्वत्र पसरलेल्या एका पत्रात या प्रकरणाचा उल्लेख होता. त्यात ६० ग्रॅम एमडी पकडल्याचे समजले तेव्हा मी घाबरलो,  असे कांबळे यांनी सांगितले. तसेच काल रात्री आपल्याला एनसीबच्या एका कर्मचाऱ्याचा दूरध्वनी आला. त्यामुळे आपल्या भीती वाटत आहे. यावेळी वानखेडेही आपल्याचा नियमीत दूरध्वनी करायचे. मी त्यांना नायजेरियन विक्रेत्यांची माहिती द्यायचो, पण या प्रकरणात आपल्याला अंधारात ठेवण्यात आले. आपण या प्रकरणी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचेही कांबळे यांनी सांगितले.

प्रभाकर साईलचा दुसऱ्या दिवशीही जबाब

मुंबई पोलिसांनी बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी ‘एनसीबी’चे पंच प्रभाकर साईल यांचा जबाब नोंदवला. वानखेडे व एनसीबीविरोधात मुंबई पोलिसांकडे एनसीबीचे पंच प्रभाकर साईल यांच्यासह चार तक्रारी आहेत. साहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) दर्जाचा अधिकारी ही चौकशी करीत आहेत. त्यात दोन्ही बाजूंचे पुरावे व साक्षीदार यांचे जबाब नोंदवून या प्रकरणी गुन्हा दाखल होतो की नाही याचा अहवाल वरिष्ठांना सादर केला जाईल. या अहवालाच्या अनुषंगाने पुढील कारवाई करण्यात येणार आहे.