रासपचे नेते दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राज्यभर विविध ठिकाणी निषेध करण्यात आला. महादेव जानकर यांनी मंगळवारी भगवानगडाच्या पायथ्यावर भाषण करताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व विधान परिषदेचे पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. अनेक ठिकाणी जानकरांच्या फोटोला जोडेमारो आंदोलन, जानकरांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन, प्रतिकात्मक पुतळ्याची गाढवावरून धिंड काढण्यात आली. बारामती येथे तर रासपच्या माजी शहराध्यक्षाच्या घरावर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे बुधवारी दिवसभर राष्ट्रवादी विरूद्ध रासप असा सामना रंगला.
औरंगाबादमध्ये महादेव जानकरांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गाढवावरून धिंड काढण्यात आली. जोडेमारो आंदोलनानंतर जानकरांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
ठाण्यात राष्ट्रवादीने महादेव जानकरांविरोधात जोरदार आंदोलन छेडले. आमदार जितेंद्र आव्हाड आणि माजी खासदार आनंद परांजपेंच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. जानकरांच्या फोटोला जोडे मारुन त्यांचे फोटो जाळण्यात आले. या वेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि ओबीसी समाजाचे नेते विजय चौघुले यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. मात्र पोलिसांच्या मध्यस्थीनंतर तणाव निवळला.
तर बारामतीमध्ये रासपचे माजी शहराध्यक्ष किशोर मिसाळ यांच्या घर आणि गाडीवर दगडफेक करण्यात आली. तसेच साताऱ्यातील पोवई नाक्यावरही राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. नगर जिल्ह्यातही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जानकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp agitation against mahadev jankar in all over maharashtra
First published on: 12-10-2016 at 18:35 IST