आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसबरोबरची आघाडी कायम राहील असे सांगतानाच देशात इतरत्र मात्र राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढवेल असे स्पष्ट संकेत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी येथे दिले. आघाडीचे जागावाटपाचे सूत्र निश्चित झाले असून राष्ट्रवादी २२ जागा लढवेल, काही जागांची अदलाबदल होऊ शकत असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी पवार यांनी पक्षनेत्यांची बैठक बोलाविली होती. राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये दररोज धुसफूस होत असते, या पाश्र्वभूमीवर आघाडीच्या भवितव्याबाबत छगन भुजबळ यांनी प्रश्न उपस्थित केला असता पवार यांनी राज्यात आघाडी कायम असल्याचा निर्वाळा दिला. महाराष्ट्र वगळता गोवा, ओडिशाा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, मेघालय, आसाम, अरुणाचल प्रदेश, केरळ आदी राज्यांमध्ये राष्ट्रवादी स्वबळावर लढेल असे पवार यांनी सांगितले.
मोदींवरून पंतप्रधानांवर शरसंधान
पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी गुजरात दंगलीवरून नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेबाबत पवार यांनी पंतप्रधानांनाच दोष दिला. याआधी सोनिया गांधी यांनी नरेंद्र मोदींना ‘मौत का सौदागर’ संबोधले होते. मात्र, त्या विधानाने मोदींनाच सहानुभूती मिळाली होती. या पाश्र्वभूमीवर ‘कितीही विरोधातील नेता असला तरी शब्द जपून वापरायचे असतात’, असा टोला पवार यांनी हाणला. ‘आदर्श’ अहवालावरून झालेल्या घोळाबद्दल त्यांनी राहुल गांधी यांच्यावरच अप्रत्यक्षपणे खापर फोडले.
आर्थिक निकषांवरच आरक्षण द्यावे
’मराठा आरक्षणाचा मुद्दा वादग्रस्त ठरला असतानाच शरद पवार यांनी आर्थिक निकषांवर मराठा किंवा मुस्लिम समाजाला शिक्षण ना नोकऱ्यांमध्ये आरक्षण द्यावे, अशी सूचना केली.
’पण हे करताना अनुसूचित जाती व जमाती तसेच इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही ही खबरदारी घ्यावी, असेही स्पष्ट केले.
’राजकीय आरक्षण नसावे या भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केला. मुस्लिम समाजाच्या समस्यांबाबत जितेंद्र आव्हाड यांनी भूमिका मांडतानाच आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला होता.
संग्रहित लेख, दिनांक 6th Jan 2014 रोजी प्रकाशित
महाराष्ट्रात आघाडी.. अन्यत्र बिघाडी
आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसबरोबरची आघाडी कायम राहील असे सांगतानाच देशात इतरत्र मात्र राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढवेल

First published on: 06-01-2014 at 01:42 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp congress coalition only in maharashtra