“ही लेडी डॉन कोण? फ्लेचर पटेलसोबत फिल्म इंडस्ट्रीत काय उद्योग सुरु आहेत?; नवाब मलिकांचे समीर वानखेडेंना सवाल

नवाब मलिक यांनी एनसीबीच्या तीन कारवायांचा उल्लेख केला असून यावेळी फ्लेचर पटेल आणि लेडी डॉन यांच्याबद्दल विचारणा केली आहे

NCP, Nawab Malik, Fletcher Patel, NCB, Sameer Wankhede, Lady Don
नवाब मलिक यांनी एनसीबीच्या तीन कारवायांचा उल्लेख केला असून यावेळी फ्लेचर पटेल आणि लेडी डॉन यांच्याबद्दल विचारणा केली आहे

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा एनसीबीच्या कारवायांवरुन प्रश्चचिन्ह उपस्थित केलं आहे. नवाब मलिक यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे क्षेत्रीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला असून काही प्रश्नांची उत्तरं मागितली आहेत. नवाब मलिक यांनी एनसीबीच्या तीन कारवायांचा उल्लेख केला असून यावेळी फ्लेचर पटेल आणि लेडी डॉन यांच्याबद्दल विचारणा केली आहे. नवाब मलिक यांनी ट्वीटरला फ्लेचर पटेल यांचे समीर वानखेडेंसोबतचे फोटोदेखील शेअर केले आहेत. तर आणखी एका फोटोत फ्लेचर पटेल आणि लेडी डॉन असा उल्लेख असणारी संबंधित महिला आहे.

नवाब मलिकांचे आरोप काय –

“एनसीबीने हा फ्लेचर पटेल कोण आहे याचा खुलासा करावा. समीर वानखेडे यांच्याशी त्यांचा काय संबंध आहे? त्यांच्या कुटुंबातील लोकांसोबत ते फोटो टाकत आहेत. माय लेडी डॉन सिस्टर नावाने टॅग करत आहेत. समीर वानखेडे यांचा या फ्लेचर पटेलशी काय संबंध आहे?,” अशी विचारणा नवाब मलिक यांनी केली आहे. “समीर वानखेडे फ्लेचर पटेल यांच्या प्रसिद्धीसाठी अनेक कार्यक्रम आयोजित करत आहेत,” असंही नवाब मलिकांनी म्हटलं आहे.

“कोणतीही केस उभी करायची असते तेव्हा ज्या ठिकाणी घटना घडते तेव्हा तेथील प्रतिष्ठीत नागरिक, आजुबाजूची लोकं यांना बोलवून पंचनामा करणं हीच कायदेशीर प्रक्रिया आहे. पण गेल्या एका वर्षात माहिती घेतली असता एनसीबीच्या तीन केसेसमध्ये स्वतंत्र पंच म्हणून फ्लेचर पटेल यांचं नाव आहे. याचा अर्थ स्वतंत्र पंच यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत. ही कारवाई ठरवून केली असल्याचं यातून स्पष्ट होत आहे. कोर्टाने अनेकदा स्वतंत्र पंच खूप केसेसमध्ये असल्यास यात तथ्य नाही असा निष्कर्ष काढला आहे. याचा अर्थ एनसीबीच्या माध्यमातून फर्जीवाडा सुरु आहे,” असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. “फ्लेचर पटेल तीन केसेसमध्ये स्वतंत्र पंच कसे झाले याचं उत्तर दिलं जावं,” अशी मागणी नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्याकडे केली आहे.

फ्लेचर पटेल कोण आहे? समीर वानखेडेंचा त्यांच्याशी काय संबंध?; नवाब मलिकांच्या नव्या आरोपामुळे खळबळ

“समीर वानखेडे यांच्याशी फ्लेचर पटेल यांचे काय संबंध आहेत? ही लेडी डॉन कोण आहे? फ्लेचर पटेल त्यांच्यासोबत कुठे कुठे जात आहेत? मुंबईत असं कोणतं रॅकेट सुरु आहे? फ्लेचर पटेल लेडी डॉनसोबत फिल्म इंडस्ट्रीत काय दहशत निर्माण करत आहेत? दहशत निर्माण करुन पैसे उकळले जात आहेत का?,” अशी विचारणा नवाब मलिक यांनी केली आहे.

“एनसीबीने पत्रकार परिषद घेत माझ्यावर टीका केली होती. पण तुम्ही खोट्या केसेस उभ्या करत आहात. घऱातली माणसं पंच करुन लोकांची फसवणूक केली जात आहे. फिल्म इंडस्ट्रीत फ्लेचर पटेल आणि लेडी डॉनच्या माध्यमातून काय उद्योग सुरु आहेत याचा खुलासा एनसीबीने करावा,” अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.

“फोटोत लेडी डॉन सिस्टर असं लिहिलेलंल दिसत आहे…पण काही लोकांनी मला हे वकील असून, एका राजकीय पक्षाच्या चित्रपट सेनेचे नेते आहेत, फिल्म इंडस्ट्रीतील अनेक लोक त्यांच्या कार्यालयात हजेरी लावत असतात अशी माहिती दिली आहे. फ्लेचर पटेल, लेडी डॉन यांचं कनेक्शन काय हे मला माहिती नाही, पण जेव्हा माहिती येईल तेव्हा पर्दाफाश करु,” असं नवाब मलिक यांनी यावेळी सांगितलं.

“पंचनाम्याची एक पद्धत आहे. एकच व्यक्ती प्रत्येक केसमध्ये पंच असेल तर या केसेस खऱ्या आहेत की खोट्या हा प्रश्न कोर्टात निर्माण होतो. मला वाटतं पंच समीर वानखेडेंचा नातेवाईक आहे, त्यावर त्यांनी खुलासा केला पाहिजे,” असं नवाब मलिक म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ncp nawab malik press conference ncb sameer wankhede lady don fletcher patel sgy

Next Story
न्यायालयाचा ‘अंतिम’ आदेश नसल्याने शालेय बसवर अद्याप कारवाईचा बडगा नाही
ताज्या बातम्या