भाजपचे किरीट सोमय्या यांनी भुजबळांच्या विरोधात आरोपांची राळ उठविली असताना राष्ट्रवादीने मौन बाळगल्याबद्दल विविध तर्कवितर्क व्यक्त केले जात होते. मात्र आज राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमकपणे सोमय्यांना प्रत्युत्तर दिले. हवेत आरोप करण्यापेक्षा किरीट सोमय्या यांनी त्यांच्याकडे ठोस पुरावे असल्यास त्यांनी न्यायालयात धाव घ्यावी, असा सल्ला राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार नवाब मलिक यांनी दिला.
विविध आरोप होत असताना सार्वजनिक  बांधकाममंत्री छगन भुजबळ एकाकी पडल्याचे चित्र दिसत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने अखेर भुजबळांची गुरुवारी पाठराखण केली. किरीट सोमय्या यांच्या आरोपांना आव्हान देतानाच, संपत्ती गोळा केल्याचा आरोप असलेले भुजबळांचे सचिव चांगले हे गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री असताना त्यांचे तसेच प्रकाश मेहता हे मंत्री असताना त्यांचेही पदावर होते. मुंडे यांना अडचणीत आणण्याचा सोमय्या यांचा प्रयत्न आहे का, अशी शंका राष्ट्रवादीने उपस्थित केली आहे. किरीट सोमय्या यांच्यामुळेच भाजपचे तत्कालीन अध्यक्ष नितीन गडकरी हे अडचणीत आले. गडकरी यांच्यावर आरोप करणारे हे सोमय्या यांचे निकटवर्तीय होते. यामुळेच गडकरी यांची पुन्हा अध्यक्षपदाची संधी हुकली, आता मुंडे यांना अडचणीत आणण्याचा सोमय्या यांचा प्रयत्न दिसतो. भुजबळ यांचे सचिव चांगले हे पूर्वी मुंडे यांचे सचिव होते. पुढे प्रकाश मेहता यांचे ते सचिव होते. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपच्या वतीने प्रकाश मेहता हे सुद्धा इच्छुक असल्यानेच सोमय्या यांनी हे आरोप केले नाहीत ना, असा शंकेचा सूरही मलिक यांनी लावला.
समर्थन गावितांचे, लक्ष्य काँग्रेस
संजय गांधी निराधार योजनेतील भ्रष्टाचाराबद्दल डॉ. विजयकुमार गावित यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यास परवानगी देण्याबाबत मंत्रिमंडळाने टाळाटाळ केली हे योग्यच असल्याचा दावा राष्ट्रवादीने केला. या योजनेचे अध्यक्षपद आमदारांकडे असते व राज्यातील २०० मतदारसंघांमध्ये या योजनेत निकष डावलून अनुदानाचे वाटप करण्यात आले होते. लातूरमध्ये ७० हजार तर नांदेडमध्ये ४५ हजार लाभार्थी बोगस आढळून आल्याकडे लक्ष वेधत मलिक यांनी काँग्रेसला लक्ष्य करण्याची संधी सोडली नाही.