भाजपच्या मागे पुन्हा डाळ घोटाळा
युतीचे सरकार पहिल्यांदा सत्तेत असताना तत्कालीन अन्न व नागरी पुरवठामंत्री शोभाताई फडणवीस यांच्यावर डाळ घोटाळ्यावरून आरोप झाले व त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. युतीच्या या मंत्रिमंडळातील अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट हे डाळीवरून लक्ष्य झाले असून, राष्ट्रवादीने बापट यांच्यावर थेट भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. तसेच डाळ घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केली आहे.
डाळीचे दर वाढण्यास भाजप सरकारची धोरणे जबाबदार असून, काही व्यापाऱ्यांना मदत होईल अशा पद्धतीने राज्याने भूमिका घेतल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. डाळ घोटाळ्याची चौकशी कायद्यानुसार उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीमार्फत चौकशी करण्याची मागणी मलिक यांनी केली आहे. डाळीवरील निर्बंध हटविण्याचे आदेश कोणी दिले, दरवाढ होत असताना राज्य सरकार गप्प का बसले, असेही सवाल राष्ट्रवादीने केले आहेत.
डाळीचे दर वाढवण्यावरून राष्ट्रवादी व काँग्रेसने भाजपला लक्ष्य केले आहे. युतीच्या पहिल्या सरकारमध्ये तत्कालीन अन्न व नागरी पुरवठामंत्री शोभाताई फडणवीस यांच्यावर आरोप झाले होते. तेव्हा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी डाळ घोटाळ्यावरून उपोषणही केले होते. तेव्हा भाजपला डाळ घोटाळा चांगलाच महागात पडला होता. नव्या सरकारमध्ये भाजपचेच अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट हे लक्ष्य झाले आहेत. विरोधकांनी टीका करतानाच बापट यांनी डाळीचा घोळ होण्याचे सारे खापर खात्याचे सचिव दीपक कपूर यांच्यावर फोडले. राष्ट्रवादीने आरोप केल्यावर मागील तारीख टाकून बापट यांनी खात्याच्या सचिवांकडून खुलासा मागविल्याची माहिती मलिक यांनी दिली.
आगामी हिवाळी अधिवेशनात डाळ घोटाळ्यावरून सरकारला धारेवर धरले जाणार असल्याचा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘सरकारमध्ये गोंधळ’
डाळ घोटाळाप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी परस्परविरोधी विधाने केल्याने सरकारमध्येच यावरून संभ्रम असल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे. जप्त केलेली तूरडाळ नक्की किती, असा प्रश्नही उपस्थित केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp target girish bapat on tur dal issue
First published on: 27-11-2015 at 04:31 IST