scorecardresearch

राष्ट्रवादीची ईडी कार्यालयावर धडक

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाच्या बाहेर शक्तिप्रदर्शन करीत मलिक यांच्या अटकेच्या विरोधात घोषणाबाजी केली.

नबाव मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुंबईत बुधवारी निदर्शने केली.

मुंबई : अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेल्या अटकेच्या कारवाईचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाच्या बाहेर शक्तिप्रदर्शन करीत मलिक यांच्या अटकेच्या विरोधात घोषणाबाजी केली.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपावरून मलिक यांच्यावर कारवाई करण्यात आली असून, राजकारणाने प्रेरित ईडीकडून अशा प्रकारची कारवाई केली जात असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेस शांत बसणार नाही, असे आव्हान पक्षाचे नेते व माजी खासदार माजिद मेमन यांनी पत्रकार परिषदेत दिले. तर केंद्र सरकारच्या अशा प्रकारच्या दडपशाहीच्या विरोधात सामूहिक लढा देऊ, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.

देवेंद्र फडणवीस यांना सत्तेत येण्याची घाई झाल्यामुळे केवळ महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी मलिक यांच्यावर त्यांच्याकडून बिनबुडाचे आरोप करण्यात आले. त्या आरोपांच्या आधारावर ईडीने कारवाई केली आहे. मलिक यांना कोणतीही नोटीस किंवा पूर्वसूचना न देता ईडीने केलेली ही कारवाई बेकायदेशीर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मागील काही दिवसांपासून नवाब मलिक यांनी राष्ट्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या गैरव्यवहारांबाबत मोहीम सुरू केली होती. त्या मोहिमेमुळे वानखेडेंना एनसीबीतून बाजूला केले गेले. त्यामुळेच फडणवीस यांनी चार महिन्यांपूर्वी केलेल्या आरोपांनंतर नवाब मलिक यांच्यावर कारवाई होत आहे, असे मेमन यांनी सांगितले. ईडी जर राजकारणाने प्रेरित अशी कारवाई करीत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस शांत बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

सामूहिकरूत्या लढा देऊ : नाना पटोले

मलिक यांच्यावर ईडीने सूडबुद्धीने केलेली ही कारवाई आहे. मलिक सातत्याने केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवत होते. त्यामुळेच ईडीच्या माध्यमातून त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. केंद्र सरकारच्या या दडपशाहीच्या विरोधात सामूहिक लढा देऊ, असा इशारा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ncp workers protest at ed office against nawab malik arrest zws