मुंबई : काँग्रेसमधील घराणेशाहीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सारे नेते नाके मुरडत असताना महाराष्ट्र भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी माजी मंत्री बबनराव लोणाीकर यांचे पूत्र राहुल लोणीकर यांची शनिवारी नियुक्ती करण्यात आली. पक्षाच्या चार मंत्र्यांचे नातेवाईक वेगवेगळय़ा पदावर असताना आणखी एका नेत्याची त्यात भर पडली आहे. माजी मंत्री लोणीकर यांचे पुत्र राहुल लोणीकर यांच्या नियुक्तीची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. तसेच नियुक्तीचे पत्रही लोणीकर यांच्या सुपूर्द करण्यात आले. काँग्रेसमधील घराणेशाहीबद्दल पंतप्रधान मोदी नेहमी भाषणांमध्ये टीका करीत असतात. तसेच भाजपमध्ये घराणेशाहीला वाव नाही, असा दावा पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा करतात. तरीही प्रदेश भारतीय जनता युवा मार्चाच्या अध्यक्षपदी लोणीाकर पुत्राची वर्णी लावण्यात आली.  मंत्रिमंडळात समावेश व्हावा म्हणून लोणीकर प्रयत्नशील होते. पण मुलाला पक्ष संघटनेत संधी देऊन पक्षाने लोणीकर यांचा पत्ता आपसूकच कापल्याचे मानले जाते.

युवा वॉरियर्स ही १८ ते २५ वयोगटातील तरुणांची एक नि:पक्ष पातळीवर काम करणारी फळी असून त्या युवकांना भाजपचे कार्य सांगून नवयुवकांची मोठी फळी उभारणार आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळालेल्या सर्व लाभार्थ्यांच्या घरी  भेट देऊन आभार व्यक्त करणारी ५० लाखांपेक्षा अधिक पत्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवली जाणार असल्याचे नियुक्तीनंतर राहुल लोणीकर यांनी जाहीर केले.

भाजपमध्ये सध्या केंद्रीय मंत्री नारायण राणे – आमदार नितेश राणे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील – खासदार सूजय विखे-पाटील, आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित – खासदार हिना गावित, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन व त्यांच्या पत्नी नगराध्यक्षा अशा काही महत्त्वाच्या नेत्यांच्या घराणेशाहीच्या जोडय़ा आहेत. याशिवाय अन्य काही छोटय़ा-मोठय़ा नेत्यांचाही समावेश आहे. यात आता लोणीकर पिता-पुत्रांची भर पडली. मोदी- नड्डा हे घराणेशाहीच्या विरोधात टीकाटिप्पणी करीत असले तरी महाराष्ट्र भाजप त्याला अपवाद असावा, असेच चित्र दिसते. भाजपमध्ये सामान्य कार्यकर्त्यांला संधी दिली जाते, असे विधान मध्यंतरी नड्डा यांनी केले होते. पण राज्य भाजपमध्ये घराणेशाहीचा पगडा दिसतो. महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी माजी मंत्री नितीन राऊत यांचे पुत्र कुणाल राऊत आहेत. भाजपच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी माजी मंत्र्याच्या पुत्राची नियुक्ती झाल्याने भाजप आणि काँग्रेसच्या युवक विभागांमध्ये घराणेशाहीचा समान धागा आहे.

 काँग्रेसची टीका

काँग्रेसमधील घराणेशाहीबद्दल भाजपचे नेते नेहमीच टीका करतात. या पार्श्वभूमीवर राहुल लोणीकर यांची युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनी टीका केली आहे. ‘या निवडीने भाजपमध्ये घराणेशाही नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले त्याबद्दल भाजपचे अभिनंदन’ अशी  प्रतिक्रिया सावंत यांनी दिली आहे.

उद्धव ठाकरे यांना मत म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला मत- बावनकुळे

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर हातमिळवणी केली व त्यांचे विचारही स्वीकारले. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे यांना मत देणे, म्हणजे काँग्रेसला व राष्ट्रवादी काँग्रेसला मत असल्याचा प्रचार भाजप घरोघरी जाऊन करणार असल्याचे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी केले. आगामी निवडणुकीत आदित्य ठाकरे यांचा वरळी मतदारसंघ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा साकोली व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बारामती मतदारसंघातही चमत्कार झालेला दिसेल, असा दावाही त्यांनी केला. भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे  यांनी महाविकास आघाडीचे सरकार असताना काँग्रेसकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अनेकदा अपमान होऊनही साथ दिली. आता राहुल गांधी यांच्या यात्रेला पाठिंबा दिला आहे.