शिवडी-न्हावाशेवा या महत्त्वाकांक्षी सागरी पुलाच्या मार्गाला जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टने (जेएनपीटी) मान्यता दर्शविल्याने राज्य शासनासाठी ही बाब समाधानकारक ठरली आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या विस्तारीकरणाची जागा आणि नियोजित सागरी मार्ग यामुळे गोंधळाचे वातावरण तयार झाले होते. जेएनपीटीने आपल्या विस्तारीकरणासाठी प्रस्तावित केलेल्या जागेत बदल करावा, अशी राज्य शासनाची भूमिका होती. या संदर्भात केंद्र आणि राज्य सरकारच्या पातळीवर चर्चा सुरू होती. केंद्रीय दळणवळण राज्यमंत्री मिलिंद देवरा यांनी मुंबईतील वाहतुकीच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी जेएनपीटीने राज्य शासनाचा नियोजित मार्ग मान्य करावा अशी सूचना केली होती. त्यानुसार जेएनपीटीने ही बाब मान्य केल्याचे देवरा यांनी सांगितले.