क्रॉफर्ड मार्केट येथील मनीष मार्केट परिसरात कोकेन विकण्यासाठी आलेल्या एका नायजेरियन नागरिकाला मुंबई पोलिसांच्या अंमलीपदार्थ प्रतिबंधक विभागाने शनिवारी अटक केली. सॅमसन चिक्युओमा ओगुगोआ (२८) असे या नायजेरियन नागरिकाचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ११० ग्रॅम कोकेनचा साठा जप्त केला. या कोकेनेची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेनुसार साडेसहा लाख रुपये इतकी आहे.
क्रॉफर्ड मार्केट येथील मनीष मार्केटजवळ एक इसम कोकेनची विक्री करण्याकरिता येणार असल्याची माहिती अंमलीपदार्थ प्रतिबंधक विभागाच्या आझाद मैदान शाखेला मिळाली होती. त्यानुसार दुपारी अडीचच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनीष मार्केटजवळ सापळा रचला आणि सॅमसनला अटक करण्यात आली.
दरम्यान, तो ज्याला हे कोकेन विकण्यासाठी आला होता, त्याबाबत मात्र काहीच कळलेले नाही. सॅमसन कोणाला हा साठा देण्यासाठी आला होता याची चौकशी पोलीस करीत आहेत.