नायजेरियन तरुणाचे अपहरण करून त्याच्याकडून पाच लाखांची खंडणी मागितल्याचे प्रकरण काळाचौकी येथे घडले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून चौघे फरारी आहेत. विशेष म्हणजे या चार जणांमध्ये मुंबई पोलिसांच्या शस्त्रास्त्र विभागातील हवालदार सुपे याचा समावेश आहे.
नवी मुंबईत राहणाऱ्या केनेट सौदी इकॉन (३५) या नायजेरियन तरुणाचा कपडय़ांचा व्यवसाय आहे. रविवारी दुपारी १च्या सुमारास त्याला आकाश नावाच्या इसमाचा फोन आला. कपडय़ांच्या संदर्भात बोलणी करण्यासाठी या इसमाने त्याला चेंबूर येथील झामा स्वीट्सजवळ बोलावले होते. केनेट टॅक्सीने त्या ठिकाणी गेला. पण त्याला आकाश नावाचा इसम भेटला नाही. तो त्याच टॅक्सीने परतत असताना चार इसमांनी त्याची टॅक्सी अडवली. आम्ही अमली पदार्थविरोधी शाखेच्या वरळी शाखेचे पोलीस आहोत असे सांगून त्यांनी केनेटला खाली उतरवले आणि बाजूला उभ्या असलेल्या तवेरा गाडीत बसवले. त्या गाडीत शस्त्रास्त्र विभागात कार्यरत असलेल्या पोलीस हवालदार सुपेसह चारजण होते.  केनेटला मारहाण करून त्या सात जणांनी त्याचे अपहरण केले. अमली पदार्थाच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन त्याच्याकडून त्यांनी ५ लाखांची खंडणी मागितली. केनेटचा भाऊ एबी याला फोन करून त्यांनी ही खंडणी मागितली. शेवटी तडजोड करून खंडणीची रक्कम दोन लाखांवर आणण्यात आली. दरम्यान, आरोपी केनेटचे अपहरण करून गाडी अंधेरी, वांद्रे आणि वडाळा या ठिकाणी फिरवत होते. केनेटच्या भावाला त्यांनी दोन लाख रुपये घेऊन रे रोड येथे बोलावले. एबीच्या एका मित्राने वरळीच्या अमली पदार्थविरोधी शाखेकडे याबाबत विचारले असता खरा प्रकार लक्षात आला. वरळी शाखेचे पोलीस पथक केनेटच्या भावासोबत रे रोडला आले.  रे रोड येथे संध्याकाळी ४ च्या सुमारास सर्व आरोपी केनेटच्या भावाची वाट बघत होते. तीन जण खाली उभे होते. पोलिसांना पाहून हवालदार सुपे याला संशय आला आणि तो गाडी घेऊन पळून गेला. पण खाली उभे असलेले  दिनेश सकपाळ (३६), सुभाष खाडे (३८) आणि अनिश संघवी (३२) हे तिघे पोलिसांच्या ताब्यात सापडले. सुरवातीला गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस टाळाटाळ करत होते. संध्याकाळी कुणी गुन्हा दाखल करायचा यावरून चेंबूर आणि काळाचौकी पोलिसांत वाद सुरू होता.  रात्री उशिरा काळाचौकी पोलिसांनी सात जणांविरोधात खंडणी आणि अपहरणाचा गुन्हा दाखल केला. हवालदार सुपे हा यापूर्वी अमली पदार्थविरोधी शाखेच्या आझाद मैदान शाखेत कार्यरत होता. पण तक्रारींमुळे त्याची शस्त्रास्त्र विभागात बदली करण्यात आली होती.