scorecardresearch

वांद्रे पूर्व येथे घर कोसळून नऊ जण जखमी

ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नऊ जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले

मुंबई: वांद्रे पूर्व परिसरातील बेहराम नगर येथील चार मजली इमारत बुधवारी शेजारच्या घरावर कोसळली. या दुर्घटनेत नऊ जण जखमी झाले असून त्यांना सांताक्रूझ येथील व्ही. एन. देसाई व वांद्रे भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अंधेरी पूर्व येथे वायू गळतीमुळे तीनजण जखमी झाले. जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असून एकाची प्रकृती गंभीर आहे.

वांद्रे (पूर्व) येथील बेहराम नगरमधील ए. के. मार्गवरील रझा मस्जिदीजवळील चार मजली इमारतीचा भाग बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास शेजारील घरावर कोसळला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी पाच फायर इंजिन, एक रेस्क्यू व्हॅन, एक रुग्णवाहिकेसह घटनास्थळी धाव घेत स्थानिक रहिवाशांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नऊ जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी चौघांवर सांताक्रूझ येथील व्ही.एन. देसाई रुग्णालयात, तर पाच जणांवर वांद्रे भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्याने सांगितले.

वायू गळतीमुळे आगीचा भडका, तीन जण जखमी अंधेरी पूर्व साकीनाका नेताजी नगर काजूपाडा येथील जैन सोसायटीच्या एका घरात वायू गळतीमुळे आग लागल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले असून  यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.

अंधेरी साकीनाका नेताजी नगर जैन सोसायटीतील एका घरात बुधवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास वायू गळतीमुळे आगीचा भडका उडाला. हकीम मुल्ला आणि सोहिल खान १५ टक्के भाजले आहेत. तर सलीम अन्सारी ८५ टक्के भाजले आहेत.  त्यांना घाटकोपरच्या राजावाडी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सलीम अन्सारी यांची प्रकृती गंभीर असून ते अतिदक्षता विभागात दाखल आहेत.

जखमींची नावे व्ही.एन. देसाई रुग्णालय

नाहीद परवीन शेख (१९) , नगमा शकिर शेख (१५), (३) मोहंमद नसीम खान (५९), मोहंमद अकिब शकिर हुसैन (२४)

वांद्रे भाभा रुग्णालय

जावेद मोहंमद युनिस (३३), नाझीया मोहंमद झाकीर (१९), संतोष कुमार मंडल (२९), फकरे आलम  मोहम्मद शेख (१८), मोईउदीन इकबाल उदीन खान (६४)

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nine injured in house collapse in bandra east zws

ताज्या बातम्या