नीलेश अडसूळ, लोकसत्ता

मुंबई : शिथिलीकरणाच्या पहिल्या टप्प्यात राज्यभर नाटकांचे प्रयोग होत असताना मुंबईतील नाटय़पंढरी समजल्या जाणाऱ्या दादरमध्ये मात्र एकही प्रयोग होऊ शकलेला नाही. आता नाटकाच्या प्रयोगांना पुन्हा परवानगी मिळाली असली तरी, दादरमधील एकही नाटय़गृह त्यासाठी सज्ज नाही. शिवाजी नाटय़ मंदिर दुरुस्तीमुळे आणखी दीड महिना बंद राहणार आहे तर, प्रभादेवीतील रवींद्र नाटय़मंदिरात भाडेदरात सवलत मिळत नसल्यामुळे निर्माते तेथे प्रयोग भरवण्यास इच्छुक नाहीत.

  दादर परिसरात शिवाजी मंदिर, यशवंत नाटय़ मंदिर आणि प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिर अशी तीन महत्त्वाची नाटय़गृहे आहेत. शिवाजी नाटय़ मंदिराची अद्याप दुरुस्ती सुरू आहे. गेल्या वर्षी नाटय़गृह सुरू झाली तेव्हाही या नाटय़गृहाच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. ‘कठोर निर्बंध लागू झाल्याने दुरुस्तीचे काम रखडले होते. आता ते अंतिम टप्प्यात आले असून एक ते दीड महिन्यात नाटय़गृह सुरू होईल,’ अशी माहिती शिवाजी मंदिर नाटय़गृहाच्या प्रतिनिधींनी दिली.   नाटय़ परिषदेच्या यशवंत नाटय़ मंदिराचा अग्निशमन दलाच्या ‘ना हरकत प्रमाणपत्राचा’ घोळ अद्याप मिटलेला नाही. मध्यंतरी झालेल्या विश्वस्त बैठकीत विश्वस्त व वास्तुविशारद शशी प्रभू यांनी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेतले असून त्याचे नूतनीकरण बाकी आहे, असे सांगितले. परंतु त्याची पूर्तता झाली नसल्याने याही नाटय़गृहाला टाळे लागले आहे.  प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिर राज्य शासनाचे असल्याने पालिकेने दिलेली नाटय़गृहे भाडय़ाची ७५ टक्के सवलत तिथे लागू होत नाही. राज्य शासनाने रवींद्र नाटय़ मंदिरासाठी केवळ ३० टक्के सवलत दिलेली आहे. नाटकांसाठी येणारा लाखो रुपये खर्च, ५० टक्के उपस्थिती, प्रेक्षक प्रतिसादाबाबत संभ्रम अशा अनेक अडचणी समोर असल्याने ३० टक्के सवलतीस निर्मात्यांचा नकार आहे. शिवाय हे नाटय़गृह येण्या-जाण्याच्या दृष्टीने अडचणीचे असल्याने इथे प्रयोग करणे निर्मात्यांना जोखमीचे वाटत आहे.