सुसंस्कृतांचे शहर म्हणून नावलौकिक असलेल्या डोंबिवलीतील सुविख्यात के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयातील शैक्षणिक वातावरणास संस्थाध्यक्ष प्रभाकर देसाई यांच्या मनमानी वागणुकीमुळे अवकळा प्राप्त झाली आहे. महाविद्यालयातील कर्मचारीच नव्हे, तर संस्थेच्या विश्वस्त मंडळातील पदाधिकाऱ्यांनाही आपल्या दावणीला बांधण्याचा प्रकार देसाई यांनी सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून या संस्थेत जुन्या विश्वस्तांना बंदी करण्यात आली आहे, असे गंभीर आरोप संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडूनच करण्यात येत आहेत.
या संस्थेच्या उभारणीत महत्त्वाचे योगदान  असणारे आबासाहेब पटवारी, रामभाऊ कापसे, डॉ. अशोक प्रधान, डॉ. यू. प्रभाकर राव, डॉ. वेणीमाधव उपासनी, डॉ. अरविंद प्रधान ही मंडळी मंडळी व्यवस्थापन समितीचा कारभार, धोरणात्मक निर्णय यामध्ये अग्रस्थानी असत. मात्र मात्र महाविद्यालयाच्या दैनंदिन कारभारात त्यांचा हस्तक्षेप नसायचा.देसाई यांनी अध्यक्षपदाची सूत्रे घेतल्यापासून, ते दैनंदिन कारभारात प्रमाणापेक्षा अधिक ढवळाढवळ करीत आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
विश्वस्तांना काडीचीही किंमत देण्यात येत नसल्याने न्याय कोठे मागायचा, या विवंचनेत प्राध्यापक, कर्मचारी अडकले आहेत. दुसरीकडे प्रभारी प्राचार्या डॉ. सुवर्णा देव याही आपण अध्यक्षांच्या सूचनेप्रमाणे कारवाई करीत असल्याचे सांगून कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडत आहेत, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
या संदर्भात विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. नरेश चंद्र यांच्याशी संपर्क साधला असता, ते प्रतिक्रियेसाठी उपलब्ध झाले नाहीत.     
‘ हुकुमशाही नाही ’
डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर देसाई यांनी शिस्त लावणे म्हणजे हुकुमशाही नाही. असा दावा केला आहे. सर्व विश्वस्तांच्या सहमतीने महाविद्यालयाचा कारभार सुरू आहे. कोणत्याही कर्मचाऱ्यास आपण मुद्दाम त्रास दिलेला नाही, कामावरून काढलेले नाही. बेशिस्त, गैरवर्तन करणाऱ्यांना आपण जाब विचारला आहे. महाविद्यालय मोठे आहे. त्यामुळे सर्वावर देखरेख करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या महाविद्यालयाचा  संस्थापक मी आहे. मग त्यामध्ये माझ्या मनाप्रमाणे चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला तर बिघडले कोठे? विद्यार्थ्यांच्या पैशाची उधळपट्टी कोठेच होत नाही. ही संस्था शैक्षणिक प्रगतीच्या दिशेने नेण्याचा आपला प्रयत्न आहे. ज्या कर्मचाऱ्यांना अन्याय वाटतो, त्यांनी कामगार न्यायालयात जावे, असेही देसाई यांनी सांगितले.
 अध्यक्षांचे मानपान!
महाविद्यालयातील प्राध्यापिका स्मिता फाटक या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम करीत असताना, अचानक तेथे संस्थाध्यक्ष प्रभाकर देसाई आले. त्यावेळी प्रा. फाटक यांनी उठून ‘मानवंदना’ दिली नाही म्हणून त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली. विशेष म्हणजे या घटनेचे समर्थन देसाई यांनी केले आहे. ती नोटीस हा शिस्तीचा भाग आहे. प्रथेप्रमाणे त्यांनी आपण गेल्यानंतर मान म्हणून उभे राहणे आवश्यक होते, असे ते म्हणाले.