‘बालभारती’च्या मराठी भाषेतील मूळ पुस्तकांचा अनुवाद करून तो इतर भाषांमध्ये उपलब्ध करून देणे बंधनकारक असताना, या वेळी तिसरी- परिसर अभ्यासाच्या उर्दू पुस्तकात परस्पर बदल करण्यात आले आहेत. शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य करणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक राजर्षी शाहू महाराज, महर्षी धोंडो केशव कर्वे, महाराजा सयाजीराव गायकवाड, पंडिता रमाबाई, कर्मवीर भाऊराव पाटील आणि पंजाबराव देशमुख यांची छायाचित्रे या पुस्तकातून काढून टाकण्यात आली आहेत. परस्पर केलेल्या बदलांची वाच्यता होऊ नये म्हणून ‘बालभारती’च्या वरिष्ठांकडून ही बाब दडपण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
राज्य पाठय़पुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची निर्मितीच मुळी राज्यातील विद्यार्थ्यांना समान अभ्यासक्रम व उद्दिष्टे असलेली पुस्तके उपलब्ध करून देणे या हेतूने झाली. त्यामुळे पाठय़पुस्तकांच्या मूळ प्रती तयार केल्यानंतर त्या इतर भाषांमध्ये अनुवादित होतात. त्यात बदल होत नाही आणि तो करायचाच असेल तर पाठय़पुस्तक लेखन समितीची परवानगी बंधनकारक असते. या वेळी तिसरी- परिसर अभ्यासाच्या पाठय़पुस्तकात शिक्षण क्षेत्रात कार्य केलेल्या महाराष्ट्रातील सुधारकांचा सचित्र उल्लेख आहे.
मूळ मराठी पुस्तकात पृष्ठ ११३ वर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह शाहू महाराज, महर्षी कर्वे, सयाजीराव गायकवाड, पंडिता रमाबाई, भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख या नऊ सुधारकांच्या छायाचित्रांचा समावेश आहे. इतर भाषांच्या पाठय़पुस्तकात ही छायाचित्रे आहेत. मात्र, उर्दू पुस्तकात सहाजणांची छायाचित्रे वगळून त्याऐवजी मौलाना अबुल कलाम आझाद, झाकीर हुसेन आदींची छायाचित्रे दिली आहेत.
ज्या सहाजणांची छायाचित्रे वगळली त्या सुधारकांचे कार्य कोणत्याही गटापुरते वा समाजापुरते सीमित नसताना हा बदल का झाला, हे स्पष्ट झालेले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No space for marathi reformers in urdu balbharti
First published on: 19-07-2014 at 06:19 IST