‘जागतिक दारिद्रय़ निमूर्लनासाठी प्रायोगिक दृष्टिकोन’ या विषयावरील संशोधनासाठी भारतीय वंशाचे अमेरिकी अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी, त्यांच्या पत्नी एस्तेर डफलो आणि मायकेल क्रेमर यांना यंदाचे अर्थशास्त्राचे नोबेल सोमवारी जाहीर झाले. आपल्या मुलाला नोबेल मिळाल्याबद्दल अभिजित यांची आई प्राध्यापक निर्मला बॅनर्जी यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्याच वेळी त्यांनी अभिजित यांची नाळ मराठीशी जुळली असल्याचेही सांगितले.

अभिजित बॅनर्जी यांचा जन्म मुंबईत १९६१ मध्ये झाला. अभिजित यांची आई म्हणजेच निर्मला बॅनर्जी या मूळच्या मुंबईकर आहेत. निर्मला यांचे माहेरचे अडनाव पाटणकर. मुंबईमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या निर्मला यांचे अर्थशास्त्रातील पदवीचे शिक्षण एल्फिन्स्टन महाविद्यालयामध्ये झाले. अभिजित यांना नोबेल मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना निर्माला यांनी बीबीसीकडे आपली प्रतिक्रिया नोंदवली. सध्या कोलकात्यामध्ये राहणाऱ्या निर्मला यांनी लंडनला गेल्यानंतर माझा मुंबईशी संपर्क कमी झाल्याची खंत व्यक्त केली. ‘लंडनला रहायला गेल्यामुळे माझा माहेरशी म्हणजेच मुंबईशी संपर्क कमी झाला. मी सध्या कोलकात्यामध्ये राहते. मुंबईत कोणी नातेवाई नसल्याने तिकडे फारसं येणं होतं नाही,’ असं निर्मला सांगतात.

ashok saraf won master dinanath mangeshkar award
“एका असामान्य परिवाराकडून…”, पुरस्कार स्वीकारल्यानंतर अशोक सराफ यांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले…
Djokovic recipient of the Bonmati Laureate Award sport news
जोकोविच, बोनमती लॉरेओ पुरस्काराचे मानकरी
Lata Mangeshkar Award 2024 announced for amitabh bachchan
अमिताभ बच्चन यांना यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार घोषित; ए.आर. रेहमान, अशोक सराफ, अतुल परचुरे यांना देखील विशेष पुरस्काराने गौरवणार
Senior colorist Ashok Mulye majha puraskar award ceremony
परोपकारात रमलेला रंगकर्मी

अभिजित यांना मराठी येते का असा प्रश्न निर्मला यांना विचरला असता त्यांनी ‘अभिजितला मराठी बऱ्याच प्रमाणत समजतं पण त्याला मराठी बोलता येत नाही. मीच लग्नानंतर कोलकात्याला आल्यावर बंगाली भाषेत लिहायला आणि बोलायला शिकले,’ असं सांगितलं.

कोलकत्यामधील सेंटर फॉर स्टडीज इन सोशल सायन्समध्ये प्राध्यापिका म्हणून निवृत्त झालेल्या निर्मला यांनी इंग्रजीमध्ये खूप लेखन केलं आहे. मराठीमध्ये लेखन करण्यासंदर्भात बोलताना त्यांनी, ‘मी स्त्रीयांच्या विषयांवर लिहिते. मला मराठीमध्ये लिहायची इच्छा होती आणि आजही आहे पण मला जुनं मराठी ठाऊक आहे. इथे (कोलकात्यामध्ये) मराठी साहित्य फारसं मिळत नाही. त्यामुळे मातृभाषेत लिहिण्याचा तितकासा आत्मविश्वास नाही. व्याकरण चुकणार नाही मी पण शब्द आठवणार नाहीत पटापट,’ असं सांगितलं.

अभिजितला नोबेल पुरस्कार मिळाल्याचा खूप आनंद झाला आहे मात्र मी त्याच्यावर रागवणार आहे. ‘या पुरस्काराबद्दल त्याने मला काहीच कल्पना दिली नव्हती त्यामुळे मी त्याच्यावर रागवणार आहे,’ असं निर्मला यांनी काही पत्रकारांशी बोलताना सांगितले.

अभिजित यांनी अर्थशास्त्रातील संशोधनात मोठी कामगिरी केली असून यापूर्वी अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्रात नोबेल मिळाले होते. मात्र सेन आणि अभिजित यांच्यामधील नात्यावरही निर्माला यांनी प्रकाश टाकला. ‘माझे पती (दिपक) आणि अमर्त्य सेन हे चांगले मित्र आहेत. १९६३-६५ दरम्यान आम्ही बर्कलेमध्ये एकत्रच होतो. त्यावेळी आमची अनेकदा भेट व्हायची. आता अभिजित आणि सेन दोघेही बोस्टनमध्येच राहतात. ते अनेकदा एकमेकांना भेटतात,’ असं निर्मला यांनी सांगितलं. मुलाबरोबरच सुनेलाही सन्मान मिळाल्याचा आनंद अधिक आहे असंही निर्मला पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाल्या. ‘दोघांना एकत्र हा पुरस्कार मिळाल्याचा खूप आनंद आहे,’ असं त्यांनी सांगितलं. देशामधील मंदीसंदर्भात बोलताना निर्मला यांनी सावध भूमिका घेतल्याचे पहायला मिळाले. ‘आकडेवारी तरी मंदी असल्याचं दाखवत आहे. मात्र त्या आकड्यांवर किती विश्वास ठेवायचा हाही प्रश्नच आहे,’ असं मत निर्मला यांनी मांडले.