चित्रपट निर्माते शकिल नुरानी यांना धमकावल्याप्रकरणी अभिनेता संजय दत्तला मुंबई न्यायालयाने अजामीनपत्र वॉरंट बजावले आहे. शकील नुरानी यांनी संजय दत्तच्या विरोधात धमकावल्याची तक्रार नोंदवली होती. ‘जान की बाजी’ या शकील नुरानी यांच्या चित्रपटात संजय दत्त काम करत होता परंतु, चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी संजय दत्त वेळ देत नसल्यामुळे १ कोटी ५३ लाखांचे नुकसान झाल्याचा आरोपही शकील नुरानी यांनी केला आहे.
मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. शिक्षा भोगण्यासाठी संजय दत्तला न्यायालयाकडून शरण येण्यासाठी चार आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे आणि आता संजय दत्त शकिल नुरानी यांना धमकावल्याच्या प्रकरणात अडकताना दिसत आहे.  न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावल्याने संजय दत्तला कधीही अटक होण्याची शक्‍यता आहे.