कुलगुरू डॉ. देशमुखांना कारणे दाखवा नोटीस

दिलेल्या मुदतीमध्ये निकाल जाहीर करण्यास अपयश

दिलेल्या मुदतीमध्ये निकाल जाहीर करण्यास अपयश; राज्यपालांनी बजावली नोटीस

दिलेल्या मुदतीत पदवी परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात अपयशी ठरल्याने राज्यपाल, कुलपती चे. विद्यासागर राव यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. मुंबई विद्यापीठाच्या दीडशे वर्षांच्या इतिहासात कारणे दाखवा नोटीस पदरी पाडून घेणारे डॉ. देशमुख पहिलेच कुलगुरू आहेत. १ ऑगस्टला ही नोटीस दिल्यानंतर डॉ. देशमुख यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते.

ऑनस्क्रीन मूल्यांकनाच्या कुलगुरूंच्या अट्टहासामुळे ३१ जुलैची मुदत संपुष्टात आली तरी पदवी परीक्षांचे निकाल जाहीर करण्यामध्ये विद्यापीठाला अपयश आले आहे. रखडलेल्या मूल्यांकनामुळे लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागले आहे. राज्यपालांनी कुलगुरूंना दोन वेळा मुदतवाढ देऊनही उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाचे काम पूर्ण झालेले नाही. तेव्हा कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्यावर कारवाईचा बडगा उगारत राज्यपालांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यातील कलम ११ (१४)(इ) आणि ८९ मधील तरतुदींनुसार कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ही नोटीस बजावल्यानंतर म्हणजेच ९ ऑगस्ट रोजी कुलगुरू रजेवर गेल्याचे सांगण्यात आले आहे. डॉ. संजय देशमुख हे विद्यापीठाचे ५४ वे कुलगुरू आहेत.

२०१६ च्या महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्याच्या कलम ११ (१४)(इ)नुसार, कुलगुरूंना पदावरून हटवणे गरजेचे आहे याची खात्री कुलपतींना पटली, की ते त्यांना हटवू शकतात. कायद्यातील कलम ८९ नुसार, परीक्षा झाल्यापासून ३० दिवसांमध्ये निकाल जाहीर करणे बंधनकारक आहे. काही कारणास्तव निकाल जाहीर करण्यास उशीर झाल्यास ४५ दिवसांची मुदतवाढ देण्यात येते; परंतु ४५ दिवसांमध्येही विद्यापीठाने निकाल जाहीर केले नाहीत तर परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक यांनी निकाल जाहीर करण्यास उशीर झाल्याच्या कारणांचा अहवाल कुलगुरूंमार्फत कुलपतींपुढे सादर करावा. या संदर्भात कुलपतींनी दिलेल्या निर्णयाला कुलगुरू बांधील असतील. दरम्यान शनिवारी दिवसभरामध्ये १३,३०३ इतक्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन पूर्ण झालेले आहे, तर ७४१ प्राध्यापक मूल्यांकनासाठी हजर होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Notice to mumbai university vc dr sanjay deshmukh