मुंबई : राज्यामध्ये वाढत्या तापमानामुळे दिवसेंदिवस उष्माघाताच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मागील दोन महिन्यांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांची संख्या २०० पार गेली आहे. नाशिक, बुलढाणा, जालना आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे.

राज्यामध्ये मार्च, एप्रिल आणि मे महिन्यामध्ये वाढत्या तापमानामुळे उष्णतेची लाट आली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसहून अधिक आहे. त्यामुळे नागरिकांना उष्माघाताचा त्रास होण्याचे प्रमाण वाढत आहे. मार्च व एप्रिल या दोन महिन्यांमध्ये राज्यभरात उष्माघाताचे तब्बल २०५ रुग्ण आढळले आहेत. सर्वाधिक रुग्ण नाशिक (२३), बुलढाणा (२१), जालना आणि धुळ्यामध्ये (प्रत्येकी २०) आढळले आहेत. धुळे जिल्ह्यात २६ एप्रिलपूर्वी उष्माघाताच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती.

आणखी वाचा-हुतात्मा गिरणी कामगारांच्या वारसांसाठीच्या सदनिका,२१ घरे आगामी सोडतीत समाविष्ट

राज्यामध्ये २६ एप्रिलपासून ५ मेपर्यंत २१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. जालनामध्ये सर्वाधिक ११ रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णांची संख्या २० झाली आहे, त्याखालोखाल नाशिक आणि बुलढाण्यामध्ये प्रत्येकी ६ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नाशिक आणि बुलढाण्यातील रुग्णांची संख्या अनुक्रमे २३ आणि २० वर पोहोचली आहे. मात्र धुळ्यातील रुग्णांची संख्या स्थिर आहे. दरम्यान, मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये उष्माघाताच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मार्चमध्ये अवघे ४० रुग्ण सापडले होते, तर एप्रिलमध्ये तब्बल १६५ रुग्ण आढळले आहेत.

उष्णतेची लाट कधी येते

सर्वसाधारणपणे एखाद्या प्रदेशात सलग तीन दिवस नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा वातावरणातील तापमान ३ अंश सेल्शियसने जास्त असेल तर त्याला उष्णतेची लाट म्हणतात किंवा एखाद्या भागात सलग दोन दिवस तापमान ४५ डिग्री सेल्शियसपेक्षा जास्त असेल तर त्या भागात उष्णतेची लाट आली आहे, असे म्हटले जाते.

आणखी वाचा-मुंबई : अक्षय तृतीयेनिमित्त घरांची विक्री तेजीत, मे महिन्यात केवळ दहा दिवसांत तीन हजारांहून अधिक घरांची विक्री

जिल्हानिहाय रुग्ण संख्या

नाशिक – २३
बुलढाणा – २१
जालना – २०
धुळे – २०
सोलापूर – १८
सिंधुदुर्ग – १०
उस्मानाबाद – ८
पुणे – ७