मुंबई : हुतात्मा गिरणी कामगारांच्या वारसांसाठी राखीव असलेली घोडपदेव येथील २१ घरे गिरणी कामगारांसाठीच्या २,५२१ घरांच्या आगामी सोडतीत समाविष्ट करण्याचा निर्णय म्हाडाच्या मुंबई मंडळाने घेतला आहे. राज्य सरकार आणि इतर सरकारी यंत्रणा २१ हुतात्मा गिरणी कामगारांच्या वारसांचा शोध घेण्यात अयशस्वी ठरल्याने गेली अनेक वर्षे ही २१ घरे रिक्त आहेत. त्यामुळे राज्य सरकारने ही घरे गिरणी कामगारांना सोडतीद्वारे वितरीत करावी, असे निर्देश म्हाडाच्या मुंबई मंडळाला दिले आहेत.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या १०६ जणांमध्ये २३ गिरणी कामगारांचा समावेश होता. या हुतात्मा गिरणी कामगारांच्या वारसांसाठी राज्य सरकारने १२ वर्षांपूर्वी घोडपदेव न्यू हिंद मिल येथील २३ घरे राखीव ठेवली होती. ही घरे हुतात्म्यांच्या वारसांना मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

हेही वाचा…मुंबई : अक्षय तृतीयेनिमित्त घरांची विक्री तेजीत, मे महिन्यात केवळ दहा दिवसांत तीन हजारांहून अधिक घरांची विक्री

त्यांच्या वारसांचा शोध घेत पात्रता निश्चिती करण्याची जबाबदारी गृहनिर्माण विभागावर सोपविण्यात आली होती. त्यानुसार गृहनिर्माण विभागाने वारसांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, आजवर २३ पैकी केवळ दोनच वारसांचाच शोध घेण्यात गृहनिर्माण विभागाला यश आले. या दोन वारसांना घराचे मोफत वितरण याआधीच करण्यात आले आहे.

मात्र, २१ वारसांचा शोध लागत नसल्याने चार-पाच वर्षांपूर्वी गृहनिर्माण विभागाने देशभरातील महत्त्वाच्या वर्तमानपत्रात वारसांची नावे प्रसिद्ध करून त्यांना कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन केले होते. मात्र यानंतरही वारस पुढे न आल्याने २१ घरे रिक्तच आहेत.

हेही वाचा…कोकण रेल्वेचा विस्टाडोम डबाही प्रतीक्षा यादीत

दुरुस्तीसाठी निविदा

● ही घरे सर्वसामान्य गिरणी कामगारांना सोडतीद्वारे उपलब्ध करण्याबाबतचा प्रस्ताव २०२१ मध्ये गृहनिर्माण विभागाकडे पाठविण्यात आला होता. हा प्रस्ताव मान्य करून राज्य सरकारने घोडपदेवमधील २१ घरे गिरणी कामगारांच्या सोडतीत समाविष्ट करावी, असे पत्र गृहनिर्माण विभागाने १९ जून २०२३ रोजी म्हाडाला पाठविली.

हेही वाचा…‘ऑपरेशन मंडे होल्ड’अंतर्गत १२२ संशयीत कंटेनर थांबवले, प्रतिंबधीत चीनी फटाके व वस्तूंच्या संशय, न्हावाशेवा बंदरावर तपासणी सुरू

● ‘एमएमआरडीए’च्या भाडेतत्त्वावरील गृहप्रकल्पातील २,५२१ घरे म्हाडाला सोडतीसाठी उपलब्ध असतील. या घरांच्या दुरुस्तीसाठी ‘एमएमआरडीए’ने निविदा मागविल्या आहेत. या वर्षात २,५२१ गिरणी कामगारांच्या घरांची सोडत मार्गी लावण्याचे मुंबई मंडळाचे नियोजन आहे. याच सोडतीत ही २१ घरे समाविष्ट केली जातील.