चर्चगेटहून बोरीवलीला जाणा-या लोकलमध्ये मद्यधुंद अवस्थेतील एका तरूणाने महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज (शनिवार) सकाळी घडली. देवेंद्र हणुमंत कडप (वय २७ वर्षे) कडप असे आरोपीचे नाव असून तो कुर्ल्याचा रहिवाशी आहे. रेल्वे पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आज पहाटे साडेपाच्या सुमारास महालक्ष्मी स्थानकाजवळ ही घटना घडली. महिला डब्यातून ही महिला महालक्ष्मीहून माटुंग्याला जात होती. त्यावेळी मद्यधुंद अवस्थेतील आरोपी याच डब्यात चढला आणि दारापाशी उभ्या असलेल्या या महिलेचा त्याने विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने महिलेला धावत्या ट्रेनमधून ढकलून देण्याचाही प्रयत्न केला. मात्र, लोअर परेल स्थानकावर डब्यात असलेल्या महिलांनी आणि इतर प्रवाशांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. धावत्या लोकलमधून ढकलून देण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याच्याविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रसंग घडला त्यावेळी एकही पोलिस सुरक्षा रक्षक डब्यात नव्हता. सदर महिला मुंबईतील नामांकीत हिंदुजा रूग्णालयामध्ये परिचारिका म्हणून काम करते. मुंबई सेंट्रल पोलिस जीआरपीने याबाबत गुन्हा दाखल केला आहे.