हेल्थ सेंटर अ‍ॅण्ड मॅनेजमेंट या नर्सिगच्या एनएनएम अभ्यासक्रमासाठी गुरुवारी घेण्यात आलेल्या परीक्षेचा पेपर फुटल्याने हजारो विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेला सामोरे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यभरातून १० ते १२ हजार विद्यार्थी या परीक्षेला बसले होते.
गुरुवारचा पेपर फुटल्याचे गोंदिया येथील एका नर्सिग संस्थेतील केंद्रावर झालेल्या परीक्षेदरम्यान स्पष्ट झाले, पण या पेपरफुटीचे मूळ भंडारा येथील एका खासगी संस्थेत असल्याचा संशय आहे. या संस्थेतील एका अध्यापकाने पैसे घेऊन हा पेपर विद्यार्थ्यांना पुरविला, असा संशय आहे. महाराष्ट्र नर्सिग कौन्सिलचे प्रभारी संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी या प्रकाराची चौकशी करू, असे स्पष्ट केले आहे. या प्रकाराच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली असून ती भंडारा येथील परीक्षा केंद्रावर जाऊन चौकशी करेल, असे त्यांनी सांगितले.