scorecardresearch

ओमायक्रॉनबाधितांना मिश्रित प्रतिपिंड औषधोपचार देण्याची आवश्यकता नाही; तज्ज्ञांचे मत

करोनाबाधितांमध्ये अँटीबॉडी कॉकटेल उपचार पद्धतीला प्रभावी असल्याचे दुसऱ्या लाटेच्या उत्तरार्धात आढळले होते.

(संग्रहित छायाचित्र)

|| शैलजा तिवले

तज्ज्ञांचे मत

मुंबई : कॅसिरीव्हीमॅब आणि इमडेव्हीमॅब या दोन्ही औषधांचे मिश्रित प्रतिपिंड औषध (अँटीबॉडी कॉकटेल) ओमायक्रॉनबाधित रुग्णांना देण्याची आवश्यकता नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. या औषधांची मागणीही गेल्या काही दिवसांपासून कमी झाली आहे. 

करोनाबाधितांमध्ये अँटीबॉडी कॉकटेल उपचार पद्धतीला प्रभावी असल्याचे दुसऱ्या लाटेच्या उत्तरार्धात आढळले होते. पालिकेमध्ये सेव्हनहिल्स रुग्णालयात या उपचार पद्धतीचा प्रायोगिक वापर केला असून यामध्ये रुग्णाला रुग्णालयात राहण्याचा कालावधी कमी होऊन अतिदक्षता विभागाची किंवा प्राणवायूची गरज कमीत कमी भासत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेची सुरुवात झाल्यानंतर डिसेंबरपासून अँटीबॉडी कॉकटेलच्या औषधाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. अँटीबॉडी कॉकटेल ही उपचार पद्धती तुलनेने महाग असून यासाठी ६० हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. औषध सलाइनद्वारे देण्यासाठी एक तासाचा अवधी पुरेसा ठरतो. त्या कालावधीत संबंधित रुग्णाचे थेट निरीक्षण करता येते. अनेक खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णालयात दाखल करून न घेता, बाह्य रुग्णसेवा (ओपीडी) विभागातूनही हे औषध दिले जात आहे.

डिसेंबरपासून या औषधाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या औषधांचा दुष्परिणाम नसल्यामुळे आम्हाला परवडते तर औषध का देत नाही, असे प्रश्न रुग्णांकडून अनेकदा विचारले जातात. त्यामुळे डॉक्टरांपेक्षाही रुग्णांकडूनच याची मागणी अधिक असल्याचे अपोलो रुग्णालयाचे साथरोगतज्ज्ञ डॉ. व्ही. रामसुब्रमणियम यांनी सांगितले.   ओमायक्रॉनची लक्षणे सौम्य स्वरुपाची असल्यामुळे या रुग्णांमध्ये अँटीबॉडी कॉकटेल उपचार पद्धतीची आवश्यकता नाही. बाधित रुग्ण ताप, सर्दी, खोकल्यासाठी दिल्या जाणाऱ्या साध्या औषधांनी बरे होत आहेत. त्यामुळे रुग्णांनी विनाकारण या औषधांची मागणी करू नये, असे करोना कृती दलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी स्पष्ट केले.  अँटीबॉडी  कॉकटेल थेरपीमध्ये प्रामुख्याने करोना विषाणूच्या आवरणावरील प्रथिने, स्पाईक प्रोटीन याचा वापर केला आहे. ओमायक्रॉनमध्ये मूळ विषाणूच्या तुलनेत या प्रथिनांमध्ये ३६ प्रकारचे उत्परिवर्तन झाले आहे. त्यामुळे बाधितांमध्ये ही उपचार पद्धती प्रभावी असण्याची शक्यता नाही, असे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अ‍ॅण्ड न्युरोसायन्सचे माजी विषाणूशास्त्रतज्ज्ञ डॉ. व्ही. रवी यांनी सांगितले.

उपचार पद्धती कशी?

कॅसिरीव्हीमॅब आणि इमडेव्हीमॅब ही प्रतिपिंड औषधी या दोन्ही औषधांचा मिश्रित वापर करून करोनाबाधितांवर उपचार केले जातात यालाच अ‍ॅन्टीबॉडी कॉकटेल थेरपी म्हटले जाते. १२ वर्षांपेक्षा अधिक आणि शारीरिक वजन ४० किलोपेक्षा जास्त आहे अशा बाधित रुग्णांना हे औषध दिले जाते. सौम्य ते मध्यम स्वरूपात ज्यांना करोनाची बाधा झाली आहे आणि प्राणवायू पुरवठ्याची गरज नाही, मात्र प्रकृती अधिक बिघडण्याचा धोका आहे, अशा जोखमीच्या गटातील बाधित रुग्णांना हे मिश्रित औषधोपचार दिले जातात, अशी माहिती सेव्हनहिल्स रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. बाळकृष्ण अडसूळ यांनी दिली.

गेल्या काही दिवसांत मागणी कमी

 डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात या उपचार पद्धतीला बरीच मागणी होती. बहुतांशवेळा रुग्णांमार्फतच मागणी केली जात होती. त्यावेळी आठवड्यातून सात ते आठ जणांना हे उपचार दिले जात होते. परंतु मागील चार ते पाच दिवसांमध्ये मागणी कमी झाली आहे. त्यामुळे आता एक किंवा दोन रुग्णांनाच उपचार दिले जात असल्याचे कोकिळाबेन रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष शेट्टी यांनी सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Omicron sufferers do not need to be given mixed antidepressant medication akp

ताज्या बातम्या