मुंबई पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग हे महिलांच्या आणि महिला पोलिसांच्या सुरक्षेच्या वल्गना करत असताना खुद्द मुंबई पोलिसांच्या सेवेत असलेल्या महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्या एका तरुणाची मात्र मंगळवारी कारवाईविना सुटका करण्यात आली़
दोन दिवसांपूर्वी माटुंगा पोलिसांच्या हद्दीत एरिक रॉड्रिक्स वाझ या तरुणाने एका महिला पोलिसाची नेमप्लेट खेचल्याची घटना घडली होती. ही महिला पोलीस कर्मचारी आणि एरिक यांच्यात मोटरसायकल उभी करण्यावरून टिळक पुल येथे वाद झाला होता. त्यानंतर या तरुणाला पोलिसांनी अटक केली होती. मात्र दोनच दिवसांत त्याच्यावर कोणतीही कारवाई न करता त्याची सुटकाही करण्यात आली. शहरात महिलांच्या विनयभंगाच्या अनेक तक्रारी समोर येत असताना खुद्द महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्या तरुणाची कोणत्याही शिक्षेविना सुटका झाल्यामुळे कायदा व सुव्यवस्था यांबाबत प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.
विशेष म्हणजे, पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी वारंवार महिलांची काळजी घेतली जाईल, महिलांच्या विनयभंगाची दखल गंभीरपणे घेतली जाईल, असे सांगितले आहे. मात्र त्यांच्याच खात्यात काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. त्यामुळे केवळ सामान्य महिलांच्याच नाही, तर महिला पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्नही पुन्हा एकदा ऐरणीवर आला आह़े