विद्याविहार रेल्वे स्थानकाजवळा नटराज बार मधील तीन कर्मचाऱ्यांच्या हत्येप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आल्याची माहिती रविवारी पोलिसांनी दिली.
बारमध्ये पूर्वी काम करणाऱ्या प्रवीण सोनावणे (२१) असे या तरुणाचे नाव आहे. बारमध्ये काम करीत असताना मृतांकडून त्याला त्रास दिला जायचा. तो राग मनात धरून प्रवीणने हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.
शनिवारी सकाळी त्यांचे मृतदेह हॉटेलच्या आवारात आढळून आले. मृतांमध्ये वेटर, सफाई कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक यांचा समावेश होता.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत  सोनावणे याने सांगितले की, बारमध्ये तिन्ही कर्मचाऱ्यांसोबत काम करीत असताना त्याला कायम शिव्या देऊन बोलायचे आणि अनेकदा त्यावरून मारामारीसुद्धा व्हायची. तो राग मनात ठेऊन चार जानेवारीच्या रात्री दारू पिऊन प्रवीण बारमध्ये आला होता. कर्मचाऱ्यांशी भांडण करून मग प्रवीणने भोसकून ठार केले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
प्रवीण सोनावणे हा मूळचा यवतमाळचा असून गेल्या दोन महिन्यांपासून तो नटराज बारमध्ये कामाला होता. दोन दिवसांपूर्वी त्याने काम सोडून दिले होते.
चार जानेवारीला रात्री नटराज बार बंद झाल्यानंतर प्रवीण सोनावणे तिथे पोचला. काम संपल्यानंतर तिन्ही कर्मचारी बारमध्ये झोपतात हे त्याला माहीत होते. दक्षिण मुंबईतील मनिष मार्केटमधून खरेदी केलेल्या चाकूने त्याने झोपलेल्या तिघांना भोसकले, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी पत्रकारांना दिली.
हत्येचा तपास करताना पोलिसांनी बारमधील जवळपास २० कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवून घेतले. यामध्ये बारमधील गायिका आणि वेटर यांचा समावेश होता. जाबजबाब नोंदवून घेतल्यानंतर त्याआधारे पोलिसांनी प्रवीण सोनावणेला अटक केली. तसेच त्याच्याजवळून मृत कर्मचाऱ्यांचे मोबाईल, घडय़ाळे असा ऐवज जप्त केला, असेही खालिद यांनी सांगितले. या हत्येसाठी प्रवीण सोनावणेला आणखी कुणी मदत केली का याचा तपास पोलीस करीत आहेत.