बिबटय़ाने केलेल्या हल्ल्यात आरे कॉलनी येथील विनोद हडळ हा तरूण थोडक्यात बचावला. मंगळवारी सकाळी आरे कॉलनीच्या जंगलातील मरोशी पाडा येथे ही घटना घडली.
मरोशी पाडा येथे विनोद हडळ (१७) राहतो. सकाळी साडेसहाच्या सुमारास विनोद शौचालयासाठी रॉयल पाम गेटच्या परिसरात गेला होता. त्यावेळी तिकडच्या झुडपात अंधारात लपलेल्या बिबटयाने त्याच्यावर अचानक हल्ला केला. विनोदने आरडाओरड केल्यानंतर विनोदचे कुटुंबीय धावत आले. अचानक माणसांना पाहून बिथरलेल्या बिबटय़ाने विनोदला जखमी अवस्थेत सोडून पळ काढला. जखमी झालेल्या विनोदला भगवती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
त्याच्या छाती आणि मानेला इजा झाली असली तरी त्याच्या प्रकृतीला धोका नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. विनोदचे कुटुंबीय वेळीच मदतीसाठी आले नसते तर कदाचित विनोद बिबटय़ाचा बळी ठरला असता, असे पोलिसांनी सांगितले. या परिसरात बिबटय़ा आल्याने या पाडय़ातील रहिवाशी मात्र भयभीत झाले आहेत. मागील आठवडय़ात बिबटय़ाने केलेल्या हल्ल्यात पवईच्या हनुमान टेकडी येथे एका महिला ठार झाली होती.