ऑनलाइन भामटय़ांनी अवघ्या काही तासांत आयआयटीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीसह चौघांना गंडा घातला. यातील तीन प्रकरणांमध्ये गुगल सर्च इंजिनद्वारे हाती आलेले संपर्क क्रमांक भामटय़ांचे होते, अशी माहिती प्राथमिक तपासातून पुढे आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयआयटीत शिक्षण घेणाऱ्या साची वाजपेयी (वय २५) हिने २७ नोव्हेंबरला ‘झोमॅटो’ अॅपद्वारे पिझ्झा मागवला होता. पिझ्झा खराब असल्याबाबत तिने दुसऱ्या दिवशी झोमॅटोकडे ईमेलद्वारे तक्रार दिली. मात्र तेथून काहीच प्रतिसाद न आल्याने २ नोव्हेंबरला साचीने गुगलवर झोमॅटोच्या ग्राहक सेवा केंद्राचा संपर्क क्रमांक मिळवला. त्यावर संपर्क साधला असता ग्राहक सेवा केंद्रातील प्रतिनिधी बोलत असल्याचे सांगून भामटय़ाने साची वापरत असलेल्या गूगल पे आणि फोन पे अॅपचे तपशील घेत तिला २७ हजार रुपयांचा गंडा घातला.
त्याच दिवशी आयआयटीत नोकरी करणाऱ्या सनी सदाना (३५) यांची ८० हजार रुपयांना फसवणूक करण्यात आली. त्यांनी ओएलएक्सवर जुन्या वापरत्या वस्तू विक्रीस ठेवल्या होत्या. त्या विकत घेण्याच्या बहाण्याने भामटय़ांनी त्यांच्याशी संपर्क साधत क्यू आर कोड पाठवले. त्याद्वारे भामटय़ांनी सदाना यांच्या बँक खात्यातून पाच वेळा परस्परव्यवहार करून ८० हजार रुपये काढून घेतले.
पवईत राहाणारे व्यावसायिक मनन शहा यांनी १ नोव्हेंबरला मित्रांसोबत हॉटेल सागर येथे रात्रीच्या जेवणाचा बेत आखला होता. आगाऊ आरक्षण करावे या हेतूने त्यांच्या मित्राने गुगलद्वारे हॉटेलचा संपर्क क्रमांक मिळवला. त्यावर संपर्क साधल्यावर आगाऊ आरक्षणासाठी २५ रुपये ऑनलाइन अदा करावे लागतील, असे सांगण्यात आले. या प्रकरणातही हॉटेल कर्मचारी असल्याचे भासवून भामटय़ांनी शहा यांना एक लिंक पाठवली. त्यावर तपशील भरताच शहा यांच्या खात्यातून ७४ हजार रुपये परस्पर वळते झाले.
या प्रकरणी तक्रार देण्यासाठी शहा पवई पोलीस ठाण्यात गेले. तेव्हा तेथे अन्य व्यावसायिक संकेत शेट्टी अशाच प्रकारे फसवणूक झाल्याची तक्रार घेऊन आल्याची माहिती शहा यांना मिळाली. संकेत यांनीही हॉटेल सागर येथे आगाऊ आरक्षणाबाबत गुगलने उपलब्ध करून दिलेल्या संपर्क क्रमांकावर चौकशी केली होती.
