पोलीस आणि पालकांची नजर चुकवून अमली पदार्थ विकत घेता यावेत, त्याआधारे रेव्ह पार्टी आयोजित करता याव्यात या उद्देशाने पश्चिम उपनगरांतील प्रतिष्ठित महाविद्यालयांतल्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली ऑनलाइन व्यवस्था अमली पदार्थविरोधी पथकाने उद्ध्वस्त केली. या व्यवस्थेत सहभागी असलेल्या दीडशे विद्यार्थ्यांचे तपशील पथकाच्या हाती लागले असून या सर्वाची चौकशी केली जाणार आहे.

पश्चिम उपनगरांतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी अमली पदार्थ मिळवण्यासाठी ‘व्हॉट्सअ‍ॅप’ समूह तयार केले आहेत. त्या प्रत्येक समूहामध्ये अमली पदार्थ पुरवणारे, विक्रेतेही सभासद आहेत. या समूहांवरून अल्पवयीन विद्यार्थी बिनबोभाट अमली पदार्थ मिळवतात, एकत्र येत त्याची नशा करतात, अशी कुणकुण अमली पदार्थविरोधी पथकाला लागली होती. या माहितीचे गांभीर्य ओळखून पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या सूचनेवरून पथकाच्या वांद्रे कक्षाने गोपनीय तपास सुरू केला. या तपासातून माहितीत तत्थ्य आढळले आणि अमली पदार्थ मिळवण्यासाठी विशेष तयार केलेले विद्यार्थ्यांचे अनेक समूह अस्तित्वात असल्याचे स्पष्ट झाले.

पथकाने विद्यार्थ्यांना मागणीनुसार अमली पदार्थ पुरवणाऱ्या विक्रेता, त्याच्या साथीदारांची माहिती मिळवून सोमवारी विलेपार्ले येथील नवीनचंद पोपटलाल कपाडिया विद्यामंदिराजवळ सापळा रचला. त्यात गांजाचा पुरवठा करणाऱ्या सुनील दास याला अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून नऊ किलो गांजाचा साठा हस्तगत करण्यात आला. त्याच्या चौकशीतून पुढे आलेली माहिती अत्यंत धक्कादायक होती.

विद्यार्थ्यांच्या प्रत्येक समूहात मुख्य विक्रेता सदस्य आहे. विद्यार्थ्यांकडून अमली पदार्थाची मागणी झाली की मुख्य विक्रेता दास किंवा अन्य साथीदाराचा मोबाइल क्रमांक व्हॉट्सअ‍ॅप समूहावर देतो. विद्यार्थी दासशी व्हॉट्सअ‍ॅपवरच संपर्क साधतात. त्यानंतर दास भेटीचे म्हणजे अमली पदार्थ पोच करण्याच्या ठिकाणाची माहिती गूगल सर्चच्या नकाशाद्वारे विद्यार्थ्यांना कळवतो. या नकाशाद्वारे विद्यार्थी त्याच्यापर्यंत पोहोचतात आणि अमली पदार्थ मिळवतात, अशी माहिती पुढे आल्याचे उपायुक्त लांडे यांनी स्पष्ट केले.

दासच्या चौकशीतून मुख्य विक्रेत्याचे तपशील मिळाले असून पथक त्याच्या मागावर आहे. या व्यवस्थेतून पश्चिम उपनगरांतील प्रतिष्ठित शिक्षण संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी असंख्य वेळा अमली पदार्थ मिळवल्याचे पथकाला समजले आहे. यापैकी काही प्रकरणांत अमली पदार्थासह विद्यार्थ्यांनी पाटर्य़ा झोडल्याची माहिती पुढे आल्याचे समजते. त्यामुळे पथकाने अशा समूहांशी संबंधित, सभासद असलेल्या विद्यार्थ्यांची यादी तयार करून टप्प्याटप्प्याने त्यांच्याकडे चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.