आणीबाणीच्या पाणीपुरवठय़ासाठी केवळ ३३ टँकरची कुमक
आणीबाणीच्या काळामध्ये मुंबईमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेच्या ताफ्यात केवळ ३३ टँकर असून मुंबईकरांच्या दारापर्यंत पाणी पोहोचविण्यात पालिका दुबळी ठरण्याचीच शक्यता आहे. परिणामी, ३७ हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असलेल्या पालिकेला आजही खासगी टँकर चालकांवरच विसंबून राहावे लागत असल्याचे उघडकीस आले आहे.
मुंबईकरांना स्वच्छ आणि पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी पालिका कटिबद्ध आहे. सध्या मुंबईत पाणी कपात लागू करण्यात आल्यामुळे मुंबईकरांना पालिकेकडून दररोज ३,२५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणी कपातीमुळे मुंबईतील डोंगराळ भागात, तसेच जलवाहिनीच्या अखेरच्या टप्प्यात राहणाऱ्या रहिवाशांना अपुरा पाणीपुरवठा होत आहे. काही ठिकाणी पाणीच मिळत नसल्याची ओरड रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
पाणीपुरवठय़ाच्या वेळी पाणी मिळू शकले नाही आणि त्याबाबत रहिवाशांनी तक्रार केल्यास पालिकेच्या विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून पाणी उपलब्ध करण्याची तयारी दर्शविली जाते. मात्र पालिकेकडे पुरेसे टँकर नसल्यामुळे रहिवाशांनाच रिकामा टँकर घेऊन येण्याची सूचना अधिकाऱ्यांकडून करण्यात येते. रिकामा टँकर उपलब्ध झाल्यानंतर नाममात्र शुल्क घेऊन रहिवाशांना पाणी पुरविले जाते, अशी माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. पालिकेकडे टँकर उपलब्ध नसल्याने रहिवाशांना पैसे मोजून खासगी टँकर चालकाकडून टँकर मिळवावा लागत आहे.
पालिकेकडे १० हजार लिटर पाणी क्षमता असलेले २८, तर ५ हजार लिटर क्षमता असलेले पाच असे एकूण ३३ टँकर आहेत. परिसरातील लोकसंख्या, पाणीपुरवठय़ाचा प्रश्न, झोपडपट्टय़ांची संख्या आदी बाबी लक्षात घेऊन प्रशासनाने हे ३३ टँकर पालिकेच्या २४ विभाग कार्यालयांमध्ये विभागून ठेवले आहेत, अशी माहिती जल विभागातील अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिली. काही विभाग कार्यालयांकडे केवळ एक, तर काही विभाग कार्यालयांकडे एकपेक्षा अधिक टँकर आहेत. मात्र टँकरच्या या असमान वाटपामुळे रहिवाशांना पाणी उपलब्ध करण्यासाठी खासगी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे, असे पालिकेच्या विभाग कार्यालयातील अधिकाऱ्याने सांगितले.
एखाद्या दिवशी तांत्रिक कारणामुळे मुंबईचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याची वेळ ओढवल्यास मुंबईकरांच्या घरापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी पालिकेच्या ताफ्यात पुरेसे टँकर नाहीत. मुंबईची लोकसंख्या १.२४ कोटीच्या घरात गेली आहे. आणीबाणीच्या काळात पुरेसे पाणी घरपोच करता यावे यासाठी पालिकेकडे पुरेसे टँकर असणे गरजेचे आहे. परंतु पालिका याकडे दुर्लक्ष करीत असल्याने खासगी टँकर चालकांची चांदी होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Only 33 tankers water supply in mumbai
First published on: 28-04-2016 at 01:51 IST